दुर्बलांसाठी शिक्षणाची गंगोत्री : विद्यामंदिर पिसात्री-
By admin | Published: June 28, 2015 10:58 PM2015-06-28T22:58:34+5:302015-06-29T00:26:57+5:30
-गुणवंत शाळा
दुर्गम भाग, खाचखळग्यांचे रस्ते, अधिक पर्जन्यामुळे वाहणारे ओढे यांसारख्या अडचणी आणि घरची गरिबी, पालकांचा अशिक्षितपणा, रोज मजुरी करून जगणारी कुटुंबं अशी पिसात्री गावची स्थिती. पन्हाळा तालुक्याच्या शेवटच्या टोकाचे गाव. त्या गावात जिल्हा परिषदेची विद्यामंदिर पिसात्री ही शाळा. एस.टी.बस नाही, वर्तमानपत्र नाही, वडापही नाही आणि डांबरी रस्ताही नाही. अशा गावातील शाळेत शिक्षक हजर होत नव्हते. तेव्हा प्रभारी मुख्याध्यापक सुभाष नारकर व शिक्षक दीपक होगाडे यांनी शाळा वाचवायची, वाढवायची असा निश्चय केला. त्यासाठी शाळेतील उपक्रम, कार्यक्रम, भौतिक सुविधा, विद्यार्थी केंद्रित अध्यापन अशासारख्या वैशिष्ट्यांचे जणू मार्केटिंग केले. फेसबुकवरूनच अख्ख्या महाराष्ट्रातही पिसात्री विद्यामंदिर शाळा प्रसिद्ध झाली.
विद्यामंदिर पिसात्री शाळा तालुका स्तरावर स्वयंमूल्यमापनातून तिसऱ्या क्रमांकावर आहे. पिसात्री गावची लोकसंख्या सातशे पन्नास व शाळेची पटसंख्या १५४ आणि आठवीपर्यंतचे वर्ग आहेत. मुलींचे शिक्षण खंडित होऊ नये म्हणून आठवीचा वर्ग व सहा शिक्षक आहेत. खरे तर शाळा टिकविण्याचा अट्टाहास व मुला-मुलींना शिक्षण देण्याचाच वेडा ध्यास. यातून विद्यामंदिर पिसात्री ही शाळा गुणवत्तेकडे वाटचाल करणारी. समाज, ग्रामस्थ, पालक, शिक्षक या माध्यमातून मुले घडत आहेत.
या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून विविध उपक्रम राबविले जात आहेत. शाळेतील उपक्रम पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटल फलक तयार केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे म्हणून प्रयत्नशील असणारे शिक्षक ‘एकच ध्यास गुणवत्तेचा आणि शाळेत मुले-मुली शिकण्याचा, टिकण्याचा’ अशा ध्येयाने प्रेरित झाले आहेत. उपस्थिती ध्वज हा उपक्रम राबवून व शालेय मंत्रिमंडळाच्या साहाय्याने मुलांची अनुपस्थिती नगण्य. शिवाय पालक प्रबोधन, गृहभेटी अशासारख्या प्रयत्नांमुळे विद्यार्थी गळती व अनुपस्थिती रोखण्यात यश मिळविणारी ही शाळा आहे.
येथील वनौषधी बाग पाहण्यासारखी, इंग्रजी वर्ड टेस्ट अत्यंत चांगल्या उपक्रमाची, संगीतमय परिपाठ, चित्रकला व कार्यानुभवात मुले तरबेज आहेत. एक तास प्रकट वाचनाचा इंग्रजी व मराठीचा, परिसरातील उद्योगांना भेटी वगैरे उपक्रम आहेतच. लेझीम व झांजपथक खूपच भावणारे. पिसात्री गाव लहान, शाळा मात्र छान व उपक्रमशील. म्हणूनच शैक्षणिक उठाव अगदी भरपूर व शाळेसाठी वस्तुरूपाने भेटीसुद्धा. २०११ ते २०१४ या तीन वर्षांच्या कालावधीत शैक्षणिक उठावाची रक्कम तीन लाख सहा हजार एवढी आहे.
‘एकच ध्यास, जिल्हा परिषद शाळा पिसात्री विकास’ हे सूत्र घेऊन राबणारे शिक्षक म्हणजे आजच्या २१व्या शतकातील अत्यंत विशेष व मनाला दिलासा देणारे. अनेक मान्यवरांनी शिक्षकांना शाबासकीची थाप दिल्याने शिक्षक झटून, झपाटून काम करताहेत. पिसात्री प्रीमिअर ली (क्रिकेट) स्पर्धा सुटीत घेऊन मुलांना शाळेशी जोडून ठेवणारे काम शिक्षक करीत आहे. स्नेहसंमेलन म्हणजे मनोरंजनाचा उत्कृष्ट असा लाभ होय. अक्षरश: पंचक्रोशी लोटतेय त्यासाठी. मान्यवरांचा सत्कार ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक देऊन करण्याची पद्धत आगळीवेगळी.
डॉ. लीला पाटील
शाळेची वैशिष्ट्ये
विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रत्येक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात. अगदी धीट, आत्मविश्वासाने बोलणारी मुलं ही आता खेडवळ, लाजरीबुजरी, गोंधळलेली वाटत नाहीत.
आमदार चंद्रदीप नरके यांनी शाळेसाठी ४०,००० रुपयांची बॅटरी, बॅकअप सुविधा दिली आहे.
पुस्तक परीक्षणातून वर्षभरात वाचलेल्या पुस्तकांचे परीक्षण, लेखकाचे नाव, प्रकाशन, आवडलेले विचार, आदी मुद्द्यांद्वारे विद्यार्थी पुस्तक परीक्षण करतात.
वर्षाखेरीस क्रमांक काढून बक्षीस दिले जाते. इंग्रजी संभाषणाचा सराव व्हावा म्हणून विद्यार्थी ूङ्मल्ल५ी१२ं३्रङ्मल्ल स्र्रीूी२ सादरीकरण करतात.
बोलक्या भिंती, आनंददायी फलक, सामुदायिक कवायती, योगासने, संगीत परिपाठ अशासारखे उपक्रम प्रेरणा देतात.
श्लोक पाठांतर, इंग्रजी शब्द पाठांतर चांगले उपक्रम म्हणून लक्षात राहतात.
दहा मिनिटांत शंभर शब्द इंग्रजी लिहिण्याची स्पर्धा दर शुक्रवारी घेतली जात असल्याने विद्यार्थ्यांना डिक्शनरी पाहण्याची सवय लागली आहे.
डिक्शनरी वाचनामुळे शिक्षकांना माहिती नसलेला शब्दाचा अर्थही विद्यार्थी सांगतात.
अभ्यासक्रमीय सर्व पुस्तके आॅनलाईन असल्याने मुलांनी पुस्तक आणले नाही तरी अध्यापन-अध्ययन करता येते.
भाजीच्या पेंडीच्या किमतीपासून जागतिक घडामोडी शाळेतच ज्ञात होतात.