Kolhapur: उदगाव येथे गुंडाचा पाठलाग करून भरदिवसा खून, दोघे संशयित पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 02:12 PM2024-04-12T14:12:18+5:302024-04-12T14:13:00+5:30
खुनाचा बदला
जयसिंगपूर : पूर्ववैमनस्यातून थरारक पाठलाग करून कुपवाडच्या तरुणावर एडक्याने वार करून उदगाव येथे भर दुपारी चारच्या सुमारास खून करण्यात आला. सचिन अज्ञान चव्हाण (वय २४, मूळ गाव रा. कुपवाड, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. सांगली-कोल्हापूर महामार्गावरील खोत पेट्रोल पंपासमोर असणाऱ्या घरात घुसून संशयितांनी सचिनचा गेम केला. त्याच्या डोकीत वार केला. हाताची दोन्ही मनगटे तुटली होती. रक्ताच्या थारोळ्यात तो पडला होता.
घटनेनंतर तत्काळ निर्भया पथकाने संशयितांचा पाठलाग करून पकडले. साहिल अस्लम समलीवाले (वय २६, रा.वाघमोडेनगर, कुपवाड) व परशुराम हनमंत बजंत्री (वय २५, रा. आलिशाननगर) अशी संशयितांची नावे आहेत. तर, अन्य काही संशयितांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कुपवाड, जि.सांगली येथे जुलै २०२० मध्ये दत्ता पाटोळे याच्या खुनाच्या आरोपाखाली सचिन चव्हाण याला अटक करण्यात आली होती. त्याचे कुटुंबीय जयसिंगपूर येथे वास्तव्यास आले होते. त्यांचे मूळ गाव बसाप्पाचीवाडी, पो. कोकळे, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली असे आहे. महिनाभरापूर्वी त्याची जामिनावर मुक्तता झाली होती. गुरुवारी तो जयसिंगपूरहून सांगली येथे मित्रांना भेटण्यासाठी दुचाकीवरून गेला होता. संशयित त्याच्या मागावरच होते. सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव येथील खोत पेट्रोल पंपासमोर आल्यानंतर हल्लेखोरांनी त्याला गाठले. दुचाकी टाकून तो स्वत:चा बचाव करण्यासाठी भीतीने पळत सुटला.
सुरुवातीला रस्त्याच्या कडेला असणाऱ्या रावसाहेब जालिहाळ यांच्या प्रभात रोलिंग शटर्स या वर्कशॉप दुकानात तो गेला. त्यानंतर दुकानाच्या आतमध्ये असणाऱ्या घरात त्याने धाव घेतली. हल्लेखोरही त्याच्या पाठोपाठ स्वयंपाक खोलीत पोहोचले. यावेळी सचिनवर त्यांनी धारदार एडक्याने वार करण्यास सुरुवात केली. रक्तबंबाळ अवस्थेत तो पुन्हा वर्कशॉपमध्ये आला. हल्लेखोरांनी पुन्हा सचिनच्या डोक्यावर, पाठीवर, हातावर वार केले. या हल्ल्यात त्याच्या दोन्ही हातांची मनगटे तुटून पडली होती. तर, डोक्यात गंभीर वार झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडून तो जागीच ठार झाला.
सचिन याचा खून करून संशयित हे घटनास्थळावरुन पळून गेले. दरम्यान, पलायन करणारे हल्लेखोर गस्त घालणाऱ्या निर्भया पथकाला दिसून आल्याने पाठलाग करून उदगाव येथील वैरण अड्ड्याजवळ असणाऱ्या दुकानाजवळील पाठीमागील बाजूस लपलेल्या संशयितांना हत्यारासह पोलिसांनी ताब्यात घेतले. या पथकातील पोलिस उपनिरीक्षक भरत पाटील, पोलिस कर्मचारी शैलेश पाटील, अमित मोरे, विक्रम मोरे यांचा समावेश होता. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक रोहिणी सोळंके, पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी पाहणी केली. शिरोळ येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
खुनाचा बदला
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय भीमराव पाटोळे याचा १० जुलै २०२० रोजी कुपवाड व मिरज एमआयडीसीच्या मध्यभागी असलेल्या रोहिणी कोल्ड स्टोअरेजमध्ये खून झाला होता. यामध्ये सचिन चव्हाण (वय २४, रा. यल्लमा मंदिराजवळ, कुपवाड) हा दोन नंबरचा आरोपी होता. सध्या तो जामिनावर सुटला होता. त्याच्यावर कुपवाड एमआयडीसी पोलिसांकडून आचारसंहितेच्या कालावधीत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यातूनच संशयितांनी त्याचा काटा काढल्याचे बोलले जात आहे.
दत्ता पाटोळे खून प्रकरणात मृत सचिन हा आरोपी होता. यातूनच हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. खूनप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून या घटनेत आणखी आरोपी आहेत का, याचा तपास सुरू आहे. - डॉ. रोहिणी सोळंके, पोलिस उपअधीक्षक