Kolhapur News: कष्टकऱ्यांच्या वस्तीत, गुंडांची मस्ती; बोंद्रेनगर दहशतीखाली

By उद्धव गोडसे | Published: March 17, 2023 12:03 PM2023-03-17T12:03:41+5:302023-03-17T12:04:07+5:30

चौकात किंवा गल्लीच्या कोपऱ्यावर थांबून टवाळक्या करणारी तरुणांची टोळकी मुलींची छेड काढण्यात आघाडीवर

Gangster terror in Bondrenagar area of ​​Kolhapur | Kolhapur News: कष्टकऱ्यांच्या वस्तीत, गुंडांची मस्ती; बोंद्रेनगर दहशतीखाली

छाया : नसीर अत्तार

googlenewsNext

उद्धव गोडसे

कोल्हापूर : उपनगर आणि खेड्याची संमिश्र वस्ती. काही कुलूपबंद घरे, तर काही घरांच्या बाहेर खेळणारी चार-पाच लहान मुले. एक-दोन ठिकाणी लसूण निवडत बसलेल्या वयोवृद्ध बायका, तर एका ठिकाणी म्हशींचा चारा-पाणी करण्यात गुंतलेला म्हातारा आणि मुख्य रस्त्यालगत एका पान टपरीसमोर दंगामस्तीत दंग असलेलं छपरी तरुणांचं टोळकं. हे चित्र आहे बोंद्रेनगरातील धनगरवाड्याचे. नात्यातीलच तरुणाच्या त्रासाला कंटाळून बुधवारी (दि. १५) एका तरुणीने आत्महत्या केल्यानंतर यावर बोलणेही स्थानिक नागरिक टाळत आहेत.

हातावरचे पोट असलेल्या कष्टकऱ्यांची वसाहत म्हणून ओळख असलेल्या बोंद्रेनगर परिसरात मागील पिढीने स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. गगनबावडा, राधानगरी आणि शाहूवाडी तालुक्यांच्या धनगरवाड्यांमधून कामाच्या शोधात कोल्हापुरात आलेल्या लोकांनी बोंद्रेनगरात आपला तळ ठोकला.

सुरुवातीला आसपासच्या खेड्यात शेतीची कामे केली. झाडांच्या फांद्या तोडणे, जांभूळ, करवंदे विकणे अशी कामे सुरूच असतात. हळूहळू महिलांना धुणीभांडी, घरकाम अशी मोलकरणीची कामे मिळू लागली. यात चार पैसे मिळत असल्याचे लक्षात येताच त्यांचे नातेवाईक, पै-पाहुणे असा गोतावळा जमा झाला. काही तरुणांनी लक्ष्मीपुरीत हमाली केली, तर काहींनी कांदे-बटाटे आणि लसूण विक्रीचा व्यवसाय करून आपला जम बसवला. आज सुमारे दोनशे कुटुंबे या परिसरात राहत आहेत.

कष्टाच्या कामात मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आता दुसरी पिढी भरकटल्याचे दिसत आहे. गेल्या काही वर्षांपासून बेरोजगारी, व्यसनाधीनता, खासगी सावकारी आणि तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे या परिसराला समस्यांचे ग्रहण लागले आहे. काही कुटुंबांचा अपवाद सोडला तर अनेक कुटुंबातील तरुणांचे शिक्षण अर्ध्यावरच सुटले आहे. मिळेल ते काम करून चार पैसे मिळवण्याचा प्रयत्न यांच्याकडून होतो.

मात्र, यातील बराच पैसा व्यसनांवर खर्च होतो. काही तरुण तर आई-वडिलांच्या पैशावर केवळ मजा मारत फिरतात. त्यातून हुल्लडबाज तरुणांची टोळकी निर्माण झाली आहेत. त्यांचाच शालेय मुलांवर प्रभाव वाढताना दिसतोय.

छपरी तरुणांची टोळकी

चित्रविचित्र हेअरस्टाईल्स, हातावर, मानेवर काढलेले टॅट्यू, आखूड पँट किंवा बरमुडे, भडक रंगाचे शर्ट आणि तोंडात मावा किंवा गुटख्याचा तोबरा. चौकात किंवा गल्लीच्या कोपऱ्यावर थांबून टवाळक्या करणारी तरुणांची टोळकी मुलींची छेड काढण्यात आघाडीवर आहेत. अशा टोळक्यांचा बंदोबस्त व्हावा, अशी अपेक्षा या परिसरातील महिला व्यक्त करतात.

पाच वर्षांत तीन घटना

गेल्या पाच वर्षांत या परिसरात तीन तरुणींनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. यातील दोन तरुणींनी हुल्लडबाजांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेतला, तर एका तरुणीसाठी नात्यातील व्यक्तीच जीवघेणी बनली.
 

Web Title: Gangster terror in Bondrenagar area of ​​Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.