Kolhapur Crime: बातमीत प्रतिक्रिया दिल्याच्या रागातून गांजा तस्करांचा तिघांवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 12:59 IST2025-02-13T12:59:03+5:302025-02-13T12:59:24+5:30
गारगोटी : "तरुणाईला ओढ गांजाची" या प्रसिद्ध झालेल्या वृत्तामध्ये प्रतिक्रिया दिल्याचा राग मनात धरून सम्राट मोरे यांच्यासह तिघांवर पाळत ठेवून दोघांनी हल्ला ...

Kolhapur Crime: बातमीत प्रतिक्रिया दिल्याच्या रागातून गांजा तस्करांचा तिघांवर हल्ला
गारगोटी : "तरुणाईला ओढ गांजाची" या प्रसिद्ध झालेल्या वृत्तामध्ये प्रतिक्रिया दिल्याचा राग मनात धरून सम्राट मोरे यांच्यासह तिघांवर पाळत ठेवून दोघांनी हल्ला केला. कुर (ता. भुदरगड) येथे बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. दरम्यान, या निषेधार्थ गुरुवारी तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद सम्राट मोरे यांनी भुदरगड पोलिसांत दिली.
बुधवारी सकाळी सम्राट मोरे, मच्छिंद्र मुगडे, आनंदा देसाई हे शक्तिपीठ महामार्गाच्या बैठकीसाठी चारचाकीतून कोल्हापूर येथे गेले होते. तेथून ते परत येत असताना संध्याकाळी साडेचारच्या सुमारास कुर बसस्थानकावर आल्यावर नशेत धुंद असलेल्या कुर येथील सुरेश अशोक वड्ड याच्यासह दोघांनी मोरे यांच्या चारचाकी गाडीवर दगड मारून शिवीगाळ केली. कमरेच्या पट्ट्याने आणि दगडाने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये म्हसवे येथील आनंदा देसाई हे जखमी झाले. गाडीची मोडतोड केली आहे.
गांजा तस्करांनी सामाजिक कार्यकर्ते कॉ. सम्राट मोरे, प्रहारचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र मुगडे व आनंदा देसाई यांच्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात आणि गांजा विरोधी जनजागृतीसाठी गुरुवारी (दि. १३) रोजी भुदरगड तालुका बंदची हाक दिली आहे. बंदचे आवाहन जनतेच्या वतीने सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वास्कर यांनी केले आहे. यावेळी मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई उपस्थित होते.
पोलिस पाटील अलर्ट
बुधवारी पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी पोलिस पाटलांची बैठक घेऊन गावागावात गांजा ओढणारे आणि विकणाऱ्यांची माहिती संकलित करून पोलिस ठाण्यास कळविण्याचे आवाहन केले आहे.
लोकमतचे अभिनंदन
ही घटना घडल्यावर अवघ्या अर्ध्या तासात पोलिस ठाण्यात विविध पक्षांच्या शंभर नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. त्यांनी पोलिस निरीक्षकांना गांजावर कडक कारवाई करण्याचे आवाहन केले. यावेळी या प्रश्नाला धाडसाने वाचा फोडल्याबद्दल लोकमतचे अभिनंदन केले.