Kolhapur News: ऊसात लावली गांजाची झाडं, बाप-लेकावर गुन्हा दाखल; साडेसात लाखांचा गांजा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 03:23 PM2023-06-17T15:23:52+5:302023-06-17T15:25:37+5:30
कारवाईपूर्वीच दोघेही फरार
गडहिंग्लज : उसाच्या फडात गांजाची झाडं लावल्याप्रकरणी गडहिंग्लज तालुक्यातील बाप लेकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. विष्णू सर्जाप्पा पिरापगोळ ऊर्फ कांबळे व काशाप्पा विष्णू पिरापगोळ ऊर्फ कांबळे (रा.हेब्बाळ कसबा नूल, ता.गडहिंग्लज) अशी त्यांची नावे आहेत.
कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी (१६) सायंकाळी ही कारवाई केली. तब्बल साडेसात लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. कारवाईपूर्वीच दोघेही फरार झाले आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विष्णू आणि काशाप्पा यांनी हेब्बाळ येथील आपल्या ऊसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेच्या पथकाने हा छापा टाकला. छाप्यात पिरापगोळ यांच्या ऊसाच्या शेतात गांजाची ७ ते ८ फुट उंचीची ७५ झाडे मिळून आली. पोलीसांनी १०७ किलो ४०० ग्रॅम वजनाचा ७ लाख ५७ हजार ५० रुपये किमतीचा हा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल कवळेकर यांच्यासह पोलिस पथकाने ही कारवाई केली. पोलिस नाईक महेश गवळी यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे अधिक तपास करीत आहेत.