गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:25 AM2021-09-21T04:25:41+5:302021-09-21T04:25:41+5:30

इचलकरंजी : ना वाजंत्री, ना मिरवणूक, ना गाजावाजा अशा शांतताप्रिय वातावरणात वस्त्रनगरीत रविवारी (दि. १९) गणेश विसर्जन पार पडला. ...

Ganpati Bappa Morya ... come early next year .. | गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या..

गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या..

Next

इचलकरंजी : ना वाजंत्री, ना मिरवणूक, ना गाजावाजा अशा शांतताप्रिय वातावरणात वस्त्रनगरीत रविवारी (दि. १९) गणेश विसर्जन पार पडला. गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...च्या जयघोषात लाडक्या बाप्पाला शहरवासीयांनी निरोप दिला. सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे नगराध्यक्षा अलका स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, प्रांताधिकारी विकास खरात, अप्पर तहसीलदार शरद पाटील, पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते मानाच्या गणपतीची आरती करून विसर्जनास सुरुवात केली. सर्वांनी शहर कोरोनामुक्त होऊ दे, असे गणरायाकडे साकडे घातले.

शहरात सर्वत्र यंदाचा गणेशोत्सव कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करत साजरा केला. शहापूर येथील खणीत गणेशमूर्ती विसर्जन करण्याचे प्रशासनाने आदेश दिले होते. त्यानुसार नागरिकांनी गणेशमूर्ती विसर्जित करून प्रशासनास सहकार्य केले. सायंकाळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शहापूर खणीस भेट देऊन पाहणी केली.

शहरात विसर्जनासाठी दुपारपर्यंत मंडळांकडून थंडा प्रतिसाद मिळाला, मात्र, दुपारनंतर विसर्जनास गती मिळाली. पोलिसांनीही मंडळांना गणेशमूर्ती विसर्जन लवकर करण्याचे आदेश दिले. अनंत चतुर्दशीदिवशीही काही घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. काही मंडळांनी खणीत विसर्जन न करता आसपासच्या परिसरातील विहिरीत गणपती विसर्जन केले. शहरात विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. खण परिसरात बॅरिकेड्स् लावून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री अडीच वाजेपर्यंत विसर्जन सुरू होते.

चौकटी

एक हजार १३५ मूर्तींचे विसर्जन

शहापूर खणीत दुपारी साडेचार वाजेपर्यंत घरगुती ४६६ व सार्वजनिक ८५ असे एकूण ५५१ मूर्तींचे विसर्जन झाले, तर रात्री अडीच वाजेपर्यंत घरगुती ७५४, तर सार्वजनिक ३८१ असे एकूण एक हजार १३५ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. पाचव्या, सातव्या व नवव्या दिवशी काही गणपतींचे विसर्जन केले होते. तसेच काही घरगुती व सार्वजनिक मंडळांनी अन्य ठिकाणी गणपती विसर्जन केले.

किरकोळ वादावादी

शहरातील मंडळे शहापूर खणीत गणपती विसर्जनासाठी घेऊन येत असताना काही मंडळांबरोबर पोलिसांची वादावादी झाली. दहा जणांना परवानगी दिली असताना केवळ चार पाच कार्यकर्त्यांनाच मूर्ती नेण्यास सांगितले. तसेच लांबूनच गणपतीचे दर्शन घेण्यास पोलिसांनी सांगितले. त्यामुळे मंडळाचे कार्यकर्ते व पोलिस यांच्यात वाद निर्माण झाला.

पंचगंगा नदी घाट सुना सुना

शहरालगत असलेल्या पंचगंगा नदीत गणपती विसर्जन करण्याची अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. कोरोना महामारी व पंचगंगा नदी प्रदूषण या कारणास्तव प्रशासनाने नदीत विसर्जन करण्यास बंदी घातली. यंदा नदीत मुबलक प्रमाणात पाणी असूनही विसर्जन करता आले नाही. त्यामुळे दरवर्षी गजबजलेला पंचगंगा नदी घाट गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही सुना सुना दिसत होता.

यांचा गणपती विसर्जन मात्र विहिरीत

शहरातील सर्व घरगुती व सार्वजनिक मंडळाचे गणपती विसर्जन शहापूर खणीत व कुंडात करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. त्यास शहरवासीयांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, पोलीस उपअधीक्षक कार्यालयात या वर्षी प्रतिष्ठापना केलेल्या गणपतीची मूर्ती मात्र टाकवडे वेस येथील एका विहिरीत विसर्जन करण्यात आली. हा चर्चेचा विषय ठरला.

पोलिस उपाशीपोटी

रविवारी अनंत चतुर्दशी असल्याने सकाळपासूनच पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांना बंदोबस्तासाठी तैनात केले होते. गावभाग हद्दीतील पोलिसांना प्रशासनाकडून वेळेवर जेवण उपलब्ध झाले नाही. त्यामुळे उन्हातान्हात आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांना उपाशीपोटी राबावे लागले.

फोटो ओळी

२००९२०२१-आयसीएच-०१

इचलकरंजीत मान्यवरांच्या हस्ते मानाच्या गणपतीची आरती करून विसर्जनास सुरुवात करण्यात आली.

छाया-अनंतसिंग

२००९२०२१-आयसीएच-०२

शहापूर खणीत क्रेनच्या साहायाने गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

छाया-उत्तम पाटील

Web Title: Ganpati Bappa Morya ... come early next year ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.