Ganpati Festival -राजारामपुरीत यंदाही डॉल्बीला फाटा,साध्या पद्धतीने गणेशमूर्तीचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 07:20 PM2020-08-22T19:20:50+5:302020-08-22T19:39:03+5:30
कोल्हापूर शहरामध्ये गणेशोत्सवामध्ये राजारामपुरी परिसरातील गणेशाच्या आगमनाची मिरवणूक सर्वाधिक लक्षवेधी असते. नेत्रदीपक रोषणाई पाहण्यासाठी तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित असते. यंदा मात्र, कोरोनामुळे पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला राजारामपुरीच्या परिसरातील मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी गणेश आगमन अत्यंत साध्या पद्धतीने केले. परिणामी यंदाही राजारामपुरीत डॉल्बीला फाटा बसला.
कोल्हापूर : शहरामध्ये गणेशोत्सवामध्ये राजारामपुरी परिसरातील गणेशाच्या आगमनाची मिरवणूक सर्वाधिक लक्षवेधी असते. नेत्रदीपक रोषणाई पाहण्यासाठी तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित असते. यंदा मात्र, कोरोनामुळे पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला राजारामपुरीच्या परिसरातील मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी गणेश आगमन अत्यंत साध्या पद्धतीने केले. परिणामी यंदाही राजारामपुरीत डॉल्बीला फाटा बसला.
कोल्हापूर शहरामध्ये सार्वजनिक गणेश आगमनाची मिरवणूक राजारामपुरीत आणि विसर्जन मिरवणूक महाद्वार रोडवर अशी खासियत आहे. यामुळे शहरातील सर्व मंडळांचे राजारामपुरी येथील गणेश आगमन मिरवणुकीकडे दरवर्षी लक्ष लागून राहिलेले असते. येथील देखावे पाहण्यासाठीही पहाटेपर्यंत गर्दी होते. मागील वर्षी पोलीस प्रशासनाने डॉल्बीला कडाडून विरोध केला. यामुळे पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्येच गणेशाचे आगमन झाले.
यंदाच्या वर्षी मंडळांनी मोठ्या उत्साहाने गणेशोत्सवाचे नियोजन केले होते. मात्र, मार्चपासून कोरोनाचे संकट आल्याने त्यांच्यामध्ये नाराजी पसरली. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी गणेश आगमनाची मिरवणूक काढू नये, अशा सूचना पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने शहरातील मंडळांना केल्या. यानुसार राजारामपुरी परिसरातील मंडळांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शहरामध्ये सर्वाधिक रुग्ण राजारामपुरी परिसरात असल्याने मंडळांनी साध्या पद्धतीनेच उत्सव साजरा करण्याचा निर्धार केला आहे. तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यातही येणार आहेत. यानुसार शनिवारी येथील मंडळांनी गणेश आगमन साध्या पद्धतीने केले. बहुतांश मंडळांनी कोणत्याही वाद्याचा वापर न करता ह्यगणपती बाप्पा मोरयाह्णच्या गजरामध्ये मूर्ती आणली. मंडपाजवळ मूर्ती आणल्यानंतर केवळ फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
राजारामपुरी चौक शांत
दरवर्षी जनता बाजार येथील राजारामपुरी चौकात गणेशमूर्ती आगमनावेळी मंडळांनी केलेली विद्युत रोषणाई पाहण्यासाठी प्रचंड गर्दी असते. यंदा कोरोनाच्या सावटामुळे दरवर्षीच्या तुलनेत चौक शांत आढळून आला. येथे पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. काही मंडळांनी आदल्या दिवशीच मूर्ती आणल्या.