Ganpati Festival -शहरात ३८६ गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 03:48 PM2020-08-24T15:48:24+5:302020-08-24T15:51:43+5:30
दीड दिवसाच्या गणपतीचे रविवारी विसर्जन करण्यात आले. यामध्ये शहरातील ३८६ गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. यामध्ये दोन मंडळांचा समावेश आहे. महापालिकेच्या वतीने विसर्जन कुंड येथील संकलित झालेल्या मूर्ती इराणी खणीमध्ये विसर्जित करण्यात आल्या.
कोल्हापूर : दीड दिवसाच्या गणपतीचे रविवारी विसर्जन करण्यात आले. यामध्ये शहरातील ३८६ गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. यामध्ये दोन मंडळांचा समावेश आहे. महापालिकेच्या वतीने विसर्जन कुंड येथील संकलित झालेल्या मूर्ती इराणी खणीमध्ये विसर्जित करण्यात आल्या.
गणेशोत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली. रविवारी दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंचगंगा नदी, रंकाळा तलाव तसेच इतर तलावांमध्ये मूर्ती विसर्जनाला बंदी घातली आहे.
यासाठी दीड दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी २४ ठिकाणी ३० पर्यावरणपूरक विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. येथे मूर्ती विसर्जनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महापालिकेच्या वतीने ट्रॅक्टर, टेम्पोमधून विसर्जन कुंड येथील मूर्ती इराणी खाण येथे विसर्जित करण्यात आल्या. यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागासह चारीही विभागीय कार्यालयांतील २५० कर्मचारी नियुक्त केले होते.
मूर्तिदानला चांगला प्रतिसाद
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून महापालिकेने प्रभागांमध्ये पर्यावरणपूरक विसर्जन कुंडाची सोय केली. या कुंडामध्ये विसर्जनासाठी यंदाच्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला. गतवर्षी दीड दिवसाच्या केवळ ६० गणपती मूर्तींचे दान करण्यात आले होते. यावेळी ३८६ मूर्ती दान झाल्या आहेत. तसेच गतवर्षीच्या तुलनेत दीड दिवसाने मूर्ती विसर्जन करण्याचे प्रमाण काही अंशी वाढल्याचे दिसून आले.
पंचगंगा नदीसह तलाव सील
सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी महापालिकेने पंचगंगा नदी, राजाराम तलाव, कोटीतीर्थ तलाव येथील परिसर बॅरिकेड्स लावून सील केले.