Ganpati Festival -बाजारपेठेत गणेशोत्सवाची लगबग, हरितालिका पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 04:53 PM2020-08-21T16:53:27+5:302020-08-21T16:55:16+5:30
महाराष्ट्रातील तमाम भक्तांचा लाडका देव गणपती बाप्पांच्या आगमनाला आता एका दिवसाचा अवधी राहिल्याने घरोघरी स्वागताची लगबग सुरू झाली आहे. घरादाराची साफसफाई, गणपतीच्या आरासाची स्वच्छता, मांडणी, आसन अशा ठेवणीतल्या साहित्यांची जुळवाजुळव करण्यात आबालवृद्ध गुंतले आहेत.
कोल्हापूर : महाराष्ट्रातील तमाम भक्तांचा लाडका देव गणपती बाप्पांच्या आगमनाला आता एका दिवसाचा अवधी राहिल्याने घरोघरी स्वागताची लगबग सुरू झाली आहे. घरादाराची साफसफाई, गणपतीच्या आरासाची स्वच्छता, मांडणी, आसन अशा ठेवणीतल्या साहित्यांची जुळवाजुळव करण्यात आबालवृद्ध गुंतले आहेत.
उद्या गणेशचतुर्थी आहे त्यानिमित्त घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. यंदा या सणावर कोरोनाचे सावट आहे. नागरिकांच्या मनात भीती असल्याने बाजारपेठेतील गर्दीत बाहेर पडून आरासचे साहित्य खरेदी करण्याची मानसिकता नागरिकांची नाही. त्यामुळे गतवर्षीच्याच साहित्यावर यंदा निभावून न्यावे लागणार आहे.
कोल्हापुरातील बाजारपेठेत गुजरात, मुंबई येथून माल येतो. यंदा तेथे कोरोनाचा जास्त कहर असल्याने माल आलेला नाही. आणायला जायचे म्हणजे व्यावसायिकांना क्वारंटाईनची प्रक्रिया करावी लागते. त्यामुळे यंदा व्यावसायिकांनी गेल्यावर्षीचाच माल बाजारात विक्रीसाठी काढला आहे.
गणेशोत्सवाला दोन दिवस राहिले असले नागरिक सांभाळूनच साहित्यांची खरेदी करत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत, गर्दी टाळून साहित्यांची खरेदी केली जात आहे. दुपारी शहरातील बिंदू चौक, शिवाजी चौक, पापाची तिकटी, गंगावेश, महाद्वार रोड, या ठिकाणी नागरिक साहित्यांची खरेदी करत होते.
हरितालिका पूजन
गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी आज, महिलांनी हरितालिका पूजन केले. चांगला पती मिळावा म्हणून कुमारिका तर असंख्य सौभाग्य व कुटुंबात सुख, शांती लाभावी म्हणून महिला हे व्रत करतात. पाटावर वाळूपासून शंकराची पिंड तयार केली जाते. त्यावर बेलपत्री वाहून, धूपआरती करून दिवसभर व्रतस्थ राहिले जाते. या व्रतासाठी बेलपत्री, वस्त्रमाळ, धूप, आरती, फळ अशा पूजेच्या साहित्यांची महिला खरेदी करत होत्या.