Ganpati Festival कोल्हापूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये जिल्हा परिषदेची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 07:16 PM2018-09-18T19:16:48+5:302018-09-18T19:20:48+5:30
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेने केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील सर्वच गावातून उंदड प्रतिसाद मिळाला आहे. नागरी भागापेक्षा ग्रामीण भागातील जनतेनेच आपल्या भागातील जलसाठे स्वच्छ ठेवण्यासाठी कंबर कसल्याचे चित्र यानिमित्ताने पुढे आले आहे.
कोल्हापूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेने केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील सर्वच गावातून उंदड प्रतिसाद मिळाला आहे. नागरी भागापेक्षा ग्रामीण भागातील जनतेनेच आपल्या भागातील जलसाठे स्वच्छ ठेवण्यासाठी कंबर कसल्याचे चित्र यानिमित्ताने पुढे आले आहे. सर्व ग्रामपंचायतींनी २ लाख ६८ हजार १४४ गणेश मूर्ती संकलित केल्या असून ११00 ट्रॉली आणि २६0 घंटागाडीमध्ये निर्माल्य संकलन करण्यात आले आहे.
गेली तीन वर्षे जिल्हा परिषदेच्यावतीने ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ साजरा करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न केले जातात. त्याला यंदा केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचे पाठबळ मिळाले. त्यामुळे यंदा महसूल विभागानेही या उपक्रमाला जोरदार पाठबळ दिले.
या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने १0 सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची जिल्हास्तरावर कार्यशाळा घेतली होती. अध्यक्षा शौमिका महाडीक, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनीही या उपक्रमामध्ये जातीने लक्ष घातले आणि पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांनी योग्य समन्वय राखल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम उभे राहू शकले. समन्वयासाठी जिल्हा परिषद स्तरावरील सर्व खातेप्रमुखांना तालुके देण्यात आले होते. तसेच तालुकास्तरावरील सर्व कर्मचा-यांना देखील उपक्रमाच्या समन्वयासाठी गावे दत्तक देण्यात आली होती.
पंचगंगा प्रदूषणप्रश्नी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषदेने २0१५ पासून या पध्दतीने गणेश विसर्जनादिवशी नेटके नियोजन करण्यात येते. ग्रामपंचायतींमार्फत प्रबोधनपर फलक,विर्सजनासाठी कृत्रिम कुंड, काहिली, निर्माल्य संकलनासाठी ट्रॅक्टर ट्रॉली व घंटागाडींची सोय या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला.
साल मूर्ती संकलन ट्रॉली निर्माल्य संकलन घंटागाडी
२0१५ १ लाख ८२ हजार ४४२ ९१६
२0१६ २ लाख ३५ हजार ८८९ १३२२
२0१७ २ लाख ४६ हजार ९४२ ११४८ १९२
२0१८ २ लाख ६८ हजार १४४ ११00 २६0
नदीकाठच्या गावांमध्ये अमन मित्तल यांचे श्रमदान
पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीच्या प्रयत्नातील एक भाग म्हणून मंगळवारी करवीर तालुक्यातील चिंचवाड आणि वळिवडे येथे जनजागृती व प्रत्यक्षश्रमदान करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी प्रत्यक्ष श्रमदानामध्ये भाग घेतला.पाणी व स्वच्छता विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन ही करण्यात आले. प्रियदर्शिनी मोरे, सचिन घाडगे, शरद भोसले या अधिकाºयांनीही श्रमदान केले.
पर्यावरण पूरक गणेशोत्सव उपक्रमातंर्गत कळंबा येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या हस्ते काहिलीमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
पंचगंगा प्रदूषणमुक्तीअंतर्गत चिंचवाड येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रियदर्शिनी मोरे, सचिन घाडगे या अधिकाºयांसह अन्य कर्मचाºयांनी मंगळवारी सकाळी श्रमदानामध्ये सहभाग घेतला.