Ganpati Festival -जिल्ह्यात १३३ गावांत गणेशोत्सवच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 12:20 PM2020-08-21T12:20:33+5:302020-08-21T12:23:40+5:30
देशासह राज्यावर कोरोनाचे संकट घोंघावत असताना कोल्हापूर जिल्ह्यात १३३ गावांनी उद्या, शनिवारपासून सुरू होणारा सार्वजनिक गणेशोत्सव सणच साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे तर सुमारे ३६७ गावांनी एक गाव, एक गणपती राबविण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर पोलीस दलातर्फे केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील गावांनी प्रतिसाद दिला आहे. विशेष म्हणजे जी गावे हा उत्सव करणार नाहीत ती गावे हाच खर्च कोरोना रुग्णांवर करणार आहेत.
तानाजी पोवार
कोल्हापूर : देशासह राज्यावर कोरोनाचे संकट घोंघावत असताना कोल्हापूर जिल्ह्यात १३३ गावांनी उद्या, शनिवारपासून सुरू होणारा सार्वजनिक गणेशोत्सव सणच साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे तर सुमारे ३६७ गावांनी एक गाव, एक गणपती राबविण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर पोलीस दलातर्फे केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील गावांनी प्रतिसाद दिला आहे. विशेष म्हणजे जी गावे हा उत्सव करणार नाहीत ती गावे हाच खर्च कोरोना रुग्णांवर करणार आहेत.
कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली असताना अशा परिस्थितीत गावांनी उत्सवावरील अनाठायी खर्च हा कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी करावा म्हणजेच खरा उत्सव साजरा केल्याचे समाधान मिळेल असे आवाहन कोल्हापूर पोलीस दलातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक
डॉ. अभिजित देशमुख यांनी केले होते. त्या आवाहनाला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उद्या, शनिवारी गणेश चतुर्दशीदिवशी गणरायाची प्रतिष्ठापना होत आहे, त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तब्बल १३३ गावांनी हा सण साजरा न करता सामाजिक कार्यावर खर्च करण्याचा निर्णय हा राज्याच्या दृष्टीने आदर्श ठरला आहे.
जिल्ह्यातील १०३० पैकी ३६७ गावांनी ह्यएक गाव, एक गणपतीह्ण तोही साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला शिवाय जिल्ह्यात एकूण ५२८९ ठिकाणी सार्वजनिक गणेशाची प्रतिष्ठाना करण्यात येणार आहे.
१) गणेशोत्सव साजरा न करणारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावे व मंडळांची संख्या :
नेसरी - २१, कोडोली - १९, इस्पुर्ली - १९, भुदरगड - १५, कागल - १३, करवीर - ०६, मुरगूड - ०८, पन्हाळा - ०३, राधानगरी - ०९, हातकणंगले - ०३, गडहिंग्लज - ०८, आजरा - ०९,
२) एक गाव एक गणपती उपक्रम करणारी प्रमुख पोलीस ठाणे हद्दीतील गावे संख्या :
करवीर - ४६, चंदगड - ६१, आजरा - ४५, राधानगरी - ३२, गडहिंग्लज - ३१, शाहूवाडी - २२, कळे - २५, कागल - १०, शिरोली एमआयडीसी - १२, मुरगूड - १४, गोकुळ शिरगाव - १२, गगनबावडा - १३, कुरुंदवाड - १०, भुदरगड - १२, पन्हाळा - ०९, कोडीली - ०२, शिवाजीनगर (इचलकरंजी) - ०२, वडगाव - ०१, हातकणंगले - ०६, शिरोळ - ०२.
कोरोनावर होणार खर्च
गणेशोत्सव साजरा न करणाऱ्या व ह्यएक गाव, एक गणपतीह्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींनी या उत्सवावरील खर्च हा कोरोना महामारीचा निपटारा करण्यासाठी आपापल्या गावात सामाजिक उपक्रमासाठी करणार आहेत. त्यासाठी कोरोनाग्रस्त रुग्णांच्यासाठी विवीध सुविधा उपलब्ध करून देण्याचा पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.
शहरातील वीस मंडळांचा २१ फुटीला फाटा
दरवर्षी लाखो रुपये खर्च करणाऱ्या कोल्हापूर शहरातील २१ फुटी उंच गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करणाऱ्या २० गणेशोत्सव मंडळांनी उत्सवात यंदा भव्य, दिव्यता न करता छोटी मूर्ती बसवणार, उत्सवावरील खर्च हा कोरोना हटविण्याच्या प्रशासनाच्या उपक्रमावर खर्च करणार असल्याचे पत्र पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना दिले आहे.