Ganesh Visarjan : पंचगंगेत एकही मूर्ती विसर्जित नाही, १४ तासांत आटोपले विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 04:09 PM2020-09-02T16:09:47+5:302020-09-02T16:13:03+5:30
कोल्हापुरात १०५४ मूर्तींचे वापरात नसलेल्या इराणी खणीत विसर्जन झाले. प्रतिवर्षी २६ ते २८ तास चालणारी विसर्जन मिरवणूक यंदा १४ तासांत संपल्याने पोलीस प्रशासनावरील ताण कमी झाला.
कोल्हापूर : कोरोना महामारीच्या अभूतपूर्व प्रसंगामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्याच्या हेतूने आपल्या उत्साहाला लगाम घालत मोठ्या संयमाने तसेच अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कोल्हापूरकरांनी मंगळवारी (दि. १) गणपती बाप्पांना निरोप दिला.
प्रशासनाने घालून दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत, सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारीची जाणीव तर राखलीच; शिवाय पर्यावरणपूरक विसर्जन मिरवणुकीचा एक आगळावेगळा आदर्श घालून दिला.
कोल्हापुरात १०५४ मूर्तींचे वापरात नसलेल्या इराणी खणीत विसर्जन झाले. प्रतिवर्षी २६ ते २८ तास चालणारी विसर्जन मिरवणूक यंदा १४ तासांत संपल्याने पोलीस प्रशासनावरील ताण कमी झाला.
गेल्या अनेक वर्षांत कोल्हापूरकरांनी पाहिलेली गणपती विसर्जनाची मिरवणूक आणि मंगळवारी पार पडलेले गणपती विसर्जन यांत कमालीचा फरक दिसून आला. प्रत्येक वर्षीच्या मिरवणुकीतील पराकोटीचा उत्साह, तरुणाईचा जल्लोष, वाद्यांचा गजर, रोषणाईचा झगमगाट, कानठळ्या बसविणारे संगीत आणि जनसागराच्या गर्दीने फुलून जाणारे रस्ते असे दिसणारे चित्र यावेळी कुठेच दिसले नाही.
कोरोनाच्या निमित्ताने कोल्हापूरकरांनी या भेसूर चित्रातून बाहेर पडण्याचा धाडसी निर्णय घेऊन तो यशस्वी केला. मिरवणुकीत फुलून जाणारा महाद्वार रोड तरी मंगळवारी सुनासुना वाटला.
मूर्ती विसर्जन आणि पंचगंगा नदी यांचे अतूट नाते. प्रदूषण टाळण्याच्या हेतूने अनेक वेळा पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी मंडळांना जागृत करण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रदीर्घ काळ चालत आलेल्या नदीतील विसर्जनाच्या परंपरेत कधीही खंड पडला नाही. तथापि यंदा कोरोनामुळे पंचगंगा नदीवर विसर्जनाला पूर्णत: बंदी घातली गेल्यामुळे यंदा प्रथमच नदीच्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन झाले नाही.
नदीतील विसर्जनाची परंपरा खंडित झाली. त्यामुळे मंगळवारी दिवसभर नदीच्या परिसरात सन्नाटा होता. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करीत आज्ञापालनाचे कर्तव्य नि:संकोचपणे पार पाडून संकटाच्या काळात एक आदर्श घालून दिला.
मिरवणुकीला बंदी असल्यामुळे विसर्जनासाठी केवळ चारच कार्यकर्त्यांना परवानगी देण्यात आली.
सकाळी साडेसात वाजल्यापासून गणपती विसर्जन सोहळा येथील इराणी खाणीवर सुरू झाला. या ठिकाणी दोन्ही खाणी बॅरिकेड्स, कनाती मारून प्रवेश बंद करण्यात आला. केवळ मोजक्याच कार्यकर्त्यांना विसर्जनासाठी सोडण्यात येत होते.
दोन्ही खाणींत गणपती विसर्जनाची जबाबदारी पोूीस, महानगरपालिका अग्निशमन दल, व्हाईट आर्मी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यांनी पार पाडली. विसर्जनावेळी मोठे १० तराफे, चार मोटारबोट यांची सोय करण्यात आली. सुरक्षिततेसाठी अग्निशमन दलाच्या तसेच व्हाईट आर्मीच्या रेस्क्यू बोट ठेवण्यात आल्या.
- फक्त इराणी खणीतच विसर्जन
प्रत्येक वर्षी पंचगंगा नदी, इराणी खण, राजाराम तलाव, कोटीतीर्थ तलाव, कसबा बावडा, आदी ठिकाणीच गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते; परंतु यंदा गर्दी टाळण्याच्या हेतूने केवळ फक्त इराणी खाणीतच गणपती विसर्जन करण्यात आले. त्यामुळे कसबा बावडा, बापट कॅम्प, विक्रमनगर, राजारामपुरी या परिसरातील शेकडो मूर्ती इराणी खणीकडे विसर्जनाकरिता आणण्यात आल्या. शहराच्या अन्य पारंपरिक ठिकाणी बॅरिकेड्स लावून परिसर बंद करण्यात आला होता. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता.
तुकाराम माळी मंडळाचा वेगळा पायंडा
मंगळवार पेठेतील तुकाराम माळी तालीम मंडळाच्या मानाच्या गणपतीचे मंडळाच्या दारातच विसर्जन करण्यात आले. परंपरा खंडित होऊ नये म्हणून १०० मीटर अंतर गणपतीची मूर्ती पालखीतून वाहून नेण्यात आली. तेथे निर्माण केलेल्या कृत्रिम कुंडात मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. या सोहळ्यास महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, नगरसेवक विजय सूर्यवंशी, संभाजी जाधव यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पोवार यांच्यासह पन्नास कार्यकर्ते उपस्थित होते.
४७५ मूर्तींचे महापालिकेकडून पुनर्विसर्जन
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने मंडळाच्या दारातच मूर्ती स्वीकारून तिचे विसर्जन करण्याची जबाबदारी घेतली होती. त्यानुसार नोंदणी झालेल्या शहरातील विविध भागांतील ४७५ गणपती मूर्तींचे संबंधित मंडळाच्या दारात विसर्जन झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने या मूर्तींचे इराणी खणीत पुनर्विसर्जन केले. मंडळाच्या दारातूनच मूर्ती नेण्याच्या महापालिकेच्या या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला.