गणपतराव आंदळकर; सर्वोत्कृष्ट मल्ल ते आदर्श वस्ताद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:20 AM2018-09-17T00:20:35+5:302018-09-17T00:20:47+5:30
वयाच्या २५व्या वर्षी कुस्तीक्षेत्रातील एक मानदंड ठरलेली हिंदकेसरी गदा पटकावणाऱ्या गणपत आंदळकर यांनी स्पर्धात्मक कुस्ती खेळणे थांबविल्यानंतर या क्षेत्रात प्रशिक्षक म्हणून स्वत:ला वाहून घेतले ते आजतागायत! पहाटे पाच आणि सायंकाळी चार वाजता श्री शाहू छत्रपती न्यू मोतीबाग तालमीत जाण्याचा शिरस्ता जोडला तो अखेरपर्यंत कायम होता.
वाढत्या वयाची, तब्येतीची काळजी न करता कुस्ती कलेवरील प्रेमासाठी त्यांनी निष्ठावंत द्रोणाचार्याची भूमिका वठविली. प्रकृती बिघडल्यामुळे ते दुपारच्या सत्रात तालमीत जात होते. नवोदित मल्लांना मार्गदर्शन करत होते. आंदळकर यांनी राष्टÑीय तालीम संघाच्या राजकारणापासून स्वत:ला बाजूला ठेवून प्रामाणिकपणे, आत्मीयतेने काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली असंख्य मल्ल निर्माण झाले. त्यांनी देश-विदेशात आपले नाव गाजविले. आंदळकरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या आणि पुढे नावलौकिक मिळविलेल्या मल्लांमध्ये महान भारत केसरी, रुस्तुम-ए-हिंद दादू चौगुले, महाराष्टÑ केसरी चंबा मुत्नाळ, अॅग्नेल निग्रो, विष्णू जोशीलकर, मॉस्को स्पर्धा विजेता संभाजी वरुटे, आंतरराष्टÑीय राष्टÑकुल स्पर्धा (ब्रिस्बेन) सुवर्णपदक विजेता रामचंद्र सारंग,आंतर विश्वविद्यालय चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेता संभाजी पाटील, उपमहाराष्टÑ केसरी बाळू पाटील यांचा समावेश आहे.
कोल्हापुरातील न्यू मोतीबाग तालमीत गेली ३४ वर्षे सातत्याने कुस्ती प्रशिक्षणाचे कार्य त्यांच्या हातून सुरू होते. त्यांनी अनेक राष्टÑीय, आंतरराष्टÑीय मल्ल तयार केले. राज्य सरकारकडून मॅट मिळवून लोकवर्गणीतून मॅटसाठी एक हॉल बांधला आहे. सध्या शेकडो मुले नियमित मातीत व मॅटवरील कुस्त्यांचा सराव करीत आहेत. आंदळकरांची ही कामगिरी त्यांच्यातील मल्लाला शोभणारी अशीच होती. तरुण मल्लासाठी प्रेरणादायी होती. त्यांच्या निधनामुळे कोल्हापूरच नव्हे तर महाराष्टÑाच्या कुस्ती क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
शेकडो
मुले नियमित मातीत व मॅटवरील कुस्त्यांचा सराव करीत आहेत. आंदळकरांची ही कामगिरी त्यांच्यातील मल्लाला शोभणारी अशीच आहे.
आठवणीतील काही कुस्त्या
१९५८ मध्ये नसीर पंजाबी याच्यासोबत गणपत आंदळकरांची कुस्ती झाली. खासबाग कुस्ती मैदानावर तीस हजार शौकिनांच्या साक्षीने आंदळकरांनी नसीरला चारी मुंड्या चितपट केले.
१९६४ मध्ये सादिक पंजाबी या गाजलेल्या मल्लासोबत आंदळकरांची कुस्ती येथील खासबागेत झाली. शौकिनांची मैदानावर मोठी गर्दी केली होती. अर्धा तास चाललेल्या कुस्तीत आंदळकरांनी सादिकला ताकदीच्या जोरावर ताब्यात जखडून ठेवले. समोर पराभव दिसतोय म्हटल्यावर सादिकचे वडील निक्का पंजाबी यांनी कुस्ती सोडविण्याची विनंती पंचांकडे केली. त्यामुळे आंदळकर यांना विजयी घोषित करण्यात आले.
१९६१ मध्ये शाहूपुरी तालमीचे नामवंत मल्ल महंमद हनीफ यांच्याबरोबरच्या लढतीत आंदळकर जिंकले. पोलीस कल्याण निधीसाठी कसबा बावडा येथील पोलीस मैदानावर ही कुस्ती झाली. त्यासाठी खास आखाडा तयार केला होता.
हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांच्याशी आंदळकरांची कुस्ती मुंबईत झाली. दोघेही नावाजलेले असल्याने या कुस्तीकडे राज्यातील कुस्तीशौकिनांचे लक्ष लागले होते. एका चालीवेळी कुस्ती कडेला गेल्याने पंचांनी कुस्तीचा निकाल दिला नाही. या कुस्तीदरम्यान थोडा वादही झाला. शेवटी ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.