‘करवीर’मध्ये ग्रामपंचायत प्रचार शिगेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:18 AM2021-01-10T04:18:27+5:302021-01-10T04:18:27+5:30
कोपार्डे : करवीर तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींपैकी चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत; पण इतर ५० ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रचाराला आता गती ...
कोपार्डे : करवीर तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींपैकी चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत; पण इतर ५० ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रचाराला आता गती मिळाली असून, उमेदवार प्रत्येक मतदारांपर्यंत व्यक्तिगत संपर्क करताना रात्री जागू लागल्या आहेत, तर मतदाराला खूश करण्यासाठी जेवणावळी सुरू झाल्या आहेत. यामुळे हॉटेल, धाबे फुल्ल दिसत आहेत.
करवीर तालुक्यातील ५४ गावांची करवीर व दक्षिण विधानसभा मतदारसंघात विभागणी होते. या टप्प्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या व शहरालगत असणाऱ्या गावांचा समावेश आहे. या ५४ ग्रामपंचायतीत २०४ प्रभागांतून ५५८ सदस्यांची निवड होणार आहे. त्यात स्त्री-पुरुष अनुसूचित जाती जमाती --१९४, नागरिकांचा मागास प्रवर्ग --२०२, तर सर्वसाधारण गटास -- ७५१ असे १२४७ उमेदवार माघारीपर्यंत होते. यातील खाटांगळे, आरे, उपवडे, म्हारूळ या ग्रामपंचायतींच्या निवडणूक बिनविरोध झाल्या आहेत, तर कोथळी -- ७,कुर्डू- १,नागदेववाडी -१ साबळेवाडी -१,बालिंगा -३, आडूर २ सांगवडे -१ अशा एकूण ७६ जागा बिनविरोध झाल्या आहेत. आता ४८२ जागांसाठी १ हजार १७१ उमेदवार रिंगणात आहेत. ४ जानेवारी ला उमेदवारी चिन्हे मिळाल्यानंतर पॅनेल बांधणी झालेल्या उमेदवारांनी लगेचच प्रचाराचे नारळ फोडून सुरुवातही केली आहे. आपल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन उमेदवार मतदारांच्या दाराचे उंंबरे झिझवू लागले आहेत. दिवसातून सकाळ दुपार, संध्याकाळ मतदारांंशी संपर्क साधून काय कल आहे याची चाचपणी करताना दिसत आहेत. यासाठी रात्रीच्या वेळी मतदारांना भेटण्याची वेळ साधताना उमेदवार दिसत आहेत. जे मतदार कोणत्याच गटाचे नाहीत त्यांना मतदानासाठी पायघड्या घातल्या जात आहेत आणि जे विरोधात आहेत त्यांना प्रलोभने दाखवून आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी भेटवस्तू, जेवणावळ्या व पाकिटे पोहोच करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येत आहे.
१) प्रचारात महिला आघाडीवर - महिला उमेदवार पुरुषांच्या प्रचारावर अवलंबून न राहता स्वतः घराघरांत मतदारांपर्यंत पोहोचून मतदारांशी संपर्क करीत हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेत आहेत. यामुळे एरव्ही सायंकाळी टीव्ही समोर बसणाऱ्या महिलांचे जथ्येच्या जथ्थे गल्लीत गल्लीत दिसत आहेत.
२)तरुणाई हॉटेल,पार्टीत -- जेवणावळी सुरू झाल्या असून, उमेदवार हॉटेलमध्ये जेवण्यासाठी पास देत असल्याने गावातील कार्यकर्ते वगळता तरुणाई हॉटेल व धाब्यावर दिसत आहे.