नवीन वर्षात ‘कचरा उठाव’ अभियान

By admin | Published: January 4, 2017 12:55 AM2017-01-04T00:55:32+5:302017-01-04T00:55:32+5:30

स्वच्छ शहराचा संकल्प : दोन बायोगॅस, तर एक खत निर्मिती प्रकल्प साकारणार

'Garbage Bail' campaign in the new year | नवीन वर्षात ‘कचरा उठाव’ अभियान

नवीन वर्षात ‘कचरा उठाव’ अभियान

Next

भारत चव्हाण --कोल्हापूर --शहराचे झपाट्याने होत असलेले नागरीकरण, त्यातून दैनंदिन कचऱ्याचा बनलेला गंभीर प्रश्न लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने २०१७ या नवीन वर्षात ‘स्वच्छ शहर’ करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे पुढच्या काही महिन्यांत शहरातील कसबा बावडा परिसरातील विघटन न होणाऱ्या कचऱ्याचे ढीग संपलेले पाहायला मिळणार आहेत. झूम प्रकल्पावरील ऊर्जानिर्मिती प्रकल्पासह उपनगरांतील कचऱ्यावर दोन बायोगॅस प्रकल्प, तर एक खतनिर्मिती प्रकल्प लवकरच साकारणार आहे.
कसबा बावडा परिसरातील झूम प्रकल्पावर साचलेला कचरा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची डोकेदुखी बनली आहे. आजमितीस या ठिकाणी अडीच लाख टन विघटन न होणारा कचरा (इनर्ट मटेरिअल) साचून राहिलेला आहे. इनर्ट मटेरिअल टाकण्यासाठी टोप येथील खाण उपलब्ध न झाल्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून हा प्रश्न गंभीर बनला आहे; परंतु आता शहरातीलच टाकाळा खाणीत हा सर्व विघटन न होणारा कचरा टाकण्यात येणार आहे. कचरा उठाव
अभियान राबवून तो झूम प्रकल्पाची साईट रिकामी केली जाणार
आहे.


झूमवर ऊर्जानिर्मिती
झूमची जागा रिकामी झाली की त्या ठिकाणी घनकचरा प्रक्रिया प्रकल्प साकारला जाणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, मुंबईस्थित रोकेम संस्थेला काम देण्यात आले आहे. महानगरपालिका ‘रोकेम’ला शहरातील दररोजचा कचरा अंदाजे १५० टन देणार असून, कंपनी त्यावर विजेची निर्मिती करणार आहे. नवीन वर्षात कचरा उठावाचे कालबद्ध अभियान राबविले जाणार आहे.
बायोगॅस प्रकल्प निविदा प्रक्रिया पूर्ण
उपनगर भागातील चार ते पाच प्रभागांतील कचरा गोळा तो एका ठिकाणी साठविण्यात येणार आहे. तेथेच त्यावर प्रक्रिया केली जाईल. पाच ते सात हजार स्क्वेअर फूट जागेवर दोन छोटे बायोगॅस प्रकल्प उभारले जात आहेत. साधारण दोन कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया, वर्क आॅर्डरची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. पुईखडी येथील एक जागा निश्चित केली आहे; तर दुसऱ्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी कचऱ्यावर गॅस आणि गॅसचा वापर करून ऊर्जानिर्मिती करण्यात येणार आहे.
मैलखड्डा येथे खतनिर्मिती
संभाजीनगर ते जरगनगर रस्त्यावर असलेल्या मैलखड्डा परिसरात खतनिर्मितीचा प्रकल्प लवकरच उभा राहणार आहे. हा प्रकल्प खासगी कंपनी स्वखर्चाने उभा करणार असून, महानगरपालिका फक्त त्यांना जागा उपलब्ध करून देणार आहे. येत्या पंधरा दिवसांत त्या ठिकाणी यंत्रणा बसविण्यास सुरुवात होईल. नजीकच्या चार ते पाच प्रभागांतील कचरा गोळा करून तो दिला जाणार आहे.

Web Title: 'Garbage Bail' campaign in the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.