नरसिंह कॉलनीच्या मुख्य चौकात कचराच कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:25 AM2021-04-21T04:25:26+5:302021-04-21T04:25:26+5:30
सागर चरापले फुलेवाडी : एकीकडे स्वच्छ भारत अभियानासाठी प्रशासन आटापिटा करत असले तरी दुसरीकडे मात्र, कचराकोंडाळ्यातील कचराही वेळेवर उचलला ...
सागर चरापले
फुलेवाडी : एकीकडे स्वच्छ भारत अभियानासाठी प्रशासन आटापिटा करत असले तरी दुसरीकडे मात्र, कचराकोंडाळ्यातील कचराही वेळेवर उचलला जात नसल्याने स्वच्छतेची ऐशी-तैशीही अनेक ठिकाणी पाहायला मिळते. गंगाई लॉन येथील नरसिंह कॉलनीच्या मुख्य चौकात असणाऱ्या दोन कचरा कोंडाळ्यातील कचरा वेळेवर उचलला नसल्याने हे दोन्हीही कोंडाळे कचऱ्याने पूर्ण भरले असून, ओसंडून वाहत आहेत. त्यातच परिसरातील कुत्री अन्नपदार्थ शोधण्यासाठी चढाओढ करताना दिसतात. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डासनिर्मिती व भटक्या कुत्र्यांची भीती निर्माण झाली आहे. नरसिंह कॉलनीमध्ये एकाच ठिकाणी दोन कचराकोंडाळे आहेत. सदरचे कोंडाळे पूर्ण भरले असून, कचरा शेजारी अस्ताव्यस्त पडला आहे. त्या कचऱ्यामध्ये भटकी कुत्री अन्न शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कचरा सर्वत्र विस्कटला जात आहे. अनेक दिवसांपासून कचरा साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. कचऱ्यामुळे डासांची निर्मिती होण्याची शक्यता असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे येथील कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
फोटो: २० फुलेवाडी कचराकोंडाळे
ओळ : नरसिंह कॉलनीमधील ओव्हर फ्लो झालेले कचराकोंडाळे. (छाया : सागर चरापले)