बेजबाबदार ग्रामस्थांकडून कचरा उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:23 AM2021-03-28T04:23:06+5:302021-03-28T04:23:06+5:30
यड्राव : येथील ओंकारेश्वर मंदिर मार्गावर ग्रामस्थांकडून उघड्यावर कचरा टाकण्यात येत आहे. कचरा गाडी दारासमोर येऊनही बेजबाबदारपणे कचरा उघड्यावर ...
यड्राव : येथील ओंकारेश्वर मंदिर मार्गावर ग्रामस्थांकडून उघड्यावर कचरा टाकण्यात येत आहे. कचरा गाडी दारासमोर येऊनही बेजबाबदारपणे कचरा उघड्यावर टाकून सर्वांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. याबाबत येथील कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून, येथे येणाऱ्या भटक्या कुत्र्यांमुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे वसुंधरा अभियान राबविण्यास ग्रामपंचायतीस अडथळा निर्माण होत आहे. याबाबत ग्रामपंचायत कोणती खबरदारी घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
यड्राव गावामध्ये ट्रॅक्टरद्वारे कचरा संकलन करण्यात येतो. यामध्ये वाडी-वस्तीसह सर्व भागातून कचरा संकलन करण्यात येतो. उघड्यावर कोठेही कचरा टाकण्यात येत नाही; परंतु पार्श्वनाथ कॉलनी, गोमटेश कॉलनी व सिटी टॉवर परिसरातील ग्रामस्थांना उघड्यावर कचरा टाकू नये, अशा वारंवार सूचना देऊनही मुख्य मार्गावर येथील कचरा दिसून येत आहे. हा कचरा रात्रीच्या वेळी-अवेळी टाकण्याचे प्रकार घडतात. या मार्गावर दुतर्फा झाडे, डांबरी रस्ता, पथदिव्यांची सोय असल्याने पहाटे व संध्याकाळी या मार्गावर फिरावयास येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तसेच ओंकारेश्वर व जिन मंदिरासह शिक्षण संस्थांकडे जाणारा हा मार्ग आहे. यामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठ मंडळीपर्यंत या मार्गावर नेहमी वर्दळ असते.
यड्राव गावची वसुंधरा अभियानासाठी निवड झाली आहे. त्याअंतर्गत स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, शिस्तबद्धता यासह उपाययोजना राबविण्यात येत आहेत. परंतु, या भागातील ग्रामस्थ बेजबाबदारपणे कचरा उघड्यावर टाकत आहेत. त्यामुळे या ठिकाणी येणारी भटकी कुत्री, दुर्गंधी व वाऱ्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या कचऱ्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर सुरू असलेल्या वसुंधरा अभियानास खीळ बसत आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन ग्रामपंचायतीने योग्य ती खबरदारी घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
फोटो - २७०३२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - यड्राव (ता. शिरोळ) येथे ओंकारेश्वर मंदिर मार्गावर पार्श्वनाथ कॉलनीजवळ उघड्यावर कचरा टाकला जात आहे. (छाया - घन:शाम कुंभार,यड्राव)