उजळाईवाडीचा नागरिकांनीच केला कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:31 AM2021-02-27T04:31:32+5:302021-02-27T04:31:32+5:30

मोहन सातपुते उचगाव : एकीकडे स्वच्छतेसाठी केंद्र आणि राज्य सरकार जनजागृतीद्वारे आटापिटा करत असले तरी, ही जागृती अजूनही उजळाईवाडीकरांच्या ...

Garbage was made by the citizens of Ujlaiwadi | उजळाईवाडीचा नागरिकांनीच केला कचरा

उजळाईवाडीचा नागरिकांनीच केला कचरा

Next

मोहन सातपुते

उचगाव : एकीकडे स्वच्छतेसाठी केंद्र आणि राज्य सरकार जनजागृतीद्वारे आटापिटा करत असले तरी, ही जागृती अजूनही उजळाईवाडीकरांच्या मनात उतरलेली नसल्याचा प्रत्यय येथील कचऱ्याच्या समस्येवरून येत आहे. उजळाईवाडीत काही नागरिकांकडून मोकळ्या जागेत, दिसेल तिथे कचरा टाकला जात आहे. परिणामी येथे जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. ग्रामपंचायतीकडेही कचरा उचलण्यासाठी अपुरी यंत्रणा असल्याने वेळेवर कचरा उचलला जात नाही. परिणामी उजळाईवाडीतील अनेक भागात कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील तुंबलेल्या कचऱ्याची वेळीच विल्हेवाट लावण्यात यावी, अशी मागणी माजी तंटामुक्त अध्यक्ष नायकू बागणे यांनी केली आहे.

चौकट:

निष्काळजीपणा कारणीभूत....

उजळाईवाडी ग्रामपंचायतीकडून कचरा गोळा करण्यासाठी दोन घंटागाड्या आहेत. या गाड्या घरा-घरातून येणारा कचरा गोळा करण्यासाठी सर्वत्र फिरत असतात. त्यासाठी वारंवार जनजागृतीही केली जाते. मात्र, अनेकजण घंटागाडीपर्यंत जाण्याचीही तसदी घेत नाहीत. त्यांच्याकडून सरळ रस्त्यावरच कचरा टाकला जात आहे. त्यामुळे मोकळ्या जागेवर कचऱ्याचे ढीगच्या ढीग साचल्याचे चित्र आहे. या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कचऱ्याचे व्यवस्थापन करणे आव्हान

सध्या उजळाईवाडी ग्रामपंचायत हद्दीत अनेक मोठमोठ्या कॉलन्या उदयास येत आहेत. त्यात ग्रामपंचायतीकडे कचरा उचलण्यासाठी दोनच घंटागाड्‌या आहेत. पाच ते सहाच स्वच्छता कर्मचारी आहेत. त्यामुळे संपूर्ण गावातील कचरा वेळेत उचलण्याचे मोठे आव्हान ग्रामपंचायतीसमोर आहे. छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, पसरीचा नगर, पाटबंधारे, कोर्ट, लघुवेतन, सायबर, म्हाडा, माजी सैनिक, रेणुकानगर, श्रीराम कॉलनी, छत्रपती नगर, उजळाई कॉलनी, महालक्ष्मी नगर, वैभव हौसिंग सोसायटी, हनुमाननगर, पैलवान दादू चौगुले नगर, शिव-पार्वती नगर, या परिसरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे.

कोट :

गावात दोन घंटागाड्या असून पाच महिला सफाई कर्मचारी आहेत. नागरिकांनी अस्ताव्यस्त कचरा न टाकता घंटागाडीत टाकावा. लोकसंख्या विस्तारत असून कचरा व्यवस्थापनासाठी जागेची व निधीची गरज आहे.

- सुवर्णा माने, सरपंच, उजळाईवाडी.

कोट :

मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा, जैव वैद्यकीय कचरा, दुर्गंधीयुक्त घाण यामुळे रहिवाशांवर दुर्गंधीचा त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. दिवसेंदिवस कचऱ्याचे ढीग साचत आहेत. त्यामुळे कचरा समस्या गंभीर रूप धारण करत आहे. त्यामुळे वेळीच कचरा उचलण्याची गरज आहे. अस्वच्छ परिसरामुळे डेंग्यू, मलेरिया होण्याची भीती वाटत आहे. तसेच कचरा रोडकडेला न टाकता ट्रॉलीमध्ये टाकण्यासाठी नागरिकांना सूचना दिल्या पाहिजेत.

- नायकू बागणे, माजी उपसरपंच, उजळाईवाडी

फोटो : २६ उजळाईवाडी

ओळ:

उजळाईवाडी, ता. करवीर येथे कचरा समस्या गंभीर बनत असून नागरिक उघड्यावरच कचरा टाकत असल्याने त्याचे ढीग साचले आहेत.

Web Title: Garbage was made by the citizens of Ujlaiwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.