बगीचा, क्रीडागंण कराच

By Admin | Published: March 19, 2015 11:46 PM2015-03-19T23:46:56+5:302015-03-19T23:54:49+5:30

उचगावकरांची आग्रही मागणी : मुख्य रस्ता चांगला करा, पुरेसे पाणी द्या, कचरा उठाव वेळेवर करा

Garden, sports carport | बगीचा, क्रीडागंण कराच

बगीचा, क्रीडागंण कराच

googlenewsNext

संतोष मिठारी/ प्रदीप शिंदे/  मोहन सातपुते - कोल्हापूर
लहान मुलांना विरंगुळ्यासाठी बगीचा, तर खेळाडूंच्या सरावासाठी क्रीडांगण व्हावे, कचरा उठाव वेळेवर करा, घंटागाडी नियमितपणे फिरवा, मुख्य रस्ता खड्डेमुक्त करा, गावतळ्याची दुरावस्था थांबवा, पुरेसे पाणी द्या, पडक्या शाळेतील नसते उद्योग थांबवा, अशा विविध समस्यांना उचगाव (ता. करवीर) येथील ग्रामस्थांनी गुरुवारी ‘लोकमत आपल्या दारी’या उपक्रमाच्या व्यासपीठावर वाचा फोडली. कुमार कन्या प्रशालासमोरील मंगेश्वर चौकात सायंकाळी साडेपाच वाजता झालेल्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आबालवृद्धांनी गावाच्या विकासाबाबतच्या अपेक्षा व्यक्त केल्या.सुमारे ६० हजार लोकसंख्येच्या या गावाचा तोंडवळा ग्रामीण व शहरी असा संमिश्र आहे. शेतकरी, सुशिक्षित, मध्यमवर्गीयांपासून कामगार, मजूर वर्गदेखील मोठ्या प्रमाणात आहे. मूळ गावापेक्षा वाढणाऱ्या उपनगरांमुळे पायाभूत सुविधांची पूर्तता करताना ग्रामपंचायतीला कसरत करावी लागत आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत आणि शहरापासून जवळ असलेल्या उचगावमध्ये नेहमीच वर्दळ असते. मुख्य रस्त्यावरच बाजारपेठ वसली आहे. त्यामुळे सायंकाळच्यावेळी याठिकाणी लोकांची मोठी वर्दळ असते. एक, तर रस्त्याची दुरावस्था आणि त्यातच लोकांची वर्दळ त्यातून वाहनधारकांना कसरत करत जावे लागते. ते टाळण्यासाठी हा रस्ता करून त्यावरील वाहतूक एकेरी करावी. तसेच मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करावे, अशी सूचना ग्रामस्थांनी केली. लहान मुलांना विरंगुळ्यासाठी फिरायला न्यायचे म्हटले तरी गावापासून पाच किलोमीटरवर असलेले टेंबलाई मंदिर अन्यथा कोल्हापुरातील एखादा बगीचा गाठावा लागतो तसेच खेळाडूंनादेखील सरावासाठी शहरातील क्रीडांगणाशिवाय पर्याय नाही. ते लक्षात घेऊन गावातील राखीव जागेत बगीचा, क्रीडांगण करावे. ग्रामस्थांना विरंगुळ्याचे ठिकाण व्हावे म्हणून महामार्गालगत असलेल्या एका मोठ्या खणीला गावतळ्याचे स्वरूप देऊन याठिकाणी ‘मिनी चौपाटी’ साकारण्यात आली होती. मात्र, त्याची दुरावस्था झाली आहे. येथील पथदीप, बैठक व्यवस्था, फूटपाथ मोडकळीस आले असून हे गावतळे कचऱ्याचे आगार बनले आहे. त्याला पूर्वीचे सुसज्ज रूप देण्यासाठी प्रयत्न व्हावेत. घंटागाडी अनियमितपणे येते, सार्वजनिक स्वच्छगृहाची वानवा आहे, कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, चौका-चौकांतील डिजीटल वाहतुकीला अडथळा निर्माण करतात अशा तक्रारीदेखील मांडल्या. वाहतुकीची कोंडी निर्माण
करण्यास कारणीभूत ठरणारे रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना डफळे कॉलनीतील भाजी मार्केटमध्ये स्थलांतरीत करावे, अशा मागण्या आणि अपेक्षा ग्रामस्थांनी केल्या.


पुरेसे पाणीच मिळत नाही
कोल्हापूर जिल्ह्णात असूनदेखील गावाला पाणीटंचाई भासते. गावासह नवीन झालेल्या अनेक कॉलनींमध्ये पाणी अगदी १५ ते २० मिनिटे येते. घरी कोणी पाहुणे आले, तरी त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करताना दमछाक करावी लागते. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
पडक्या शाळेतील नसते उद्योग थांबवा...
मंगेश्वर चौकालगत जिल्हा परिषदेची शाळेची पडझड झाली आहे. याठिकाणी सायंकाळनंतर मद्यपींचा वावर असतो शिवाय अनेक नसत्या स्वरूपातील उद्योग याठिकाणी सुरू असतात. मद्यपींचे अशोभनीय वर्तन अनेकांना त्रासदायक ठरते. त्याचा बंदोबस्त ग्रामपंचायतीने करावा, अशी मागणी आग्रहाने करण्यात आली.

कामांत राजकारण नाही
ग्रामस्थांना चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी विकासकामांत कोणतेही राजकारण न आणता, सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. - नागेश चौगुले, उपसरंपच
गावतळ्यातच कचरा
सध्या गावतळ्यातच ग्रामस्थ कचरा टाकत असल्याने त्याचे अस्तित्व नष्ट होऊ लागले आहे. या तळाच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या फुटपाथाची मोठी दुरवस्था झाली आहे   - दादासो माने
चार दिवसांतून घंटागाडी
चार दिवसांतून एकदाच घंटागाडी गावात फिरते. ती नियमित फिरणे गरजेचे आहे. त्यामुळे अन्यत्र कचरा पडणार नाही.
- पांडुरंग मोरे
रस्त्यांचे काम गरजेचे
मूळ गावापेक्षा उपनगर वाढत आहे. त्यामुळे सर्वांना सुविधा पुरविणे फार कठीण बनले आहे. वाढती नागरी वस्ती पाहता मणेरमळ्यातील रस्त्यांचे काम होणे गरजेचे आहे. - दत्तात्रय तोरस्कर, ग्रा.पं. सदस्य
आरोग्याच्या सुविधा द्या-- गावातील आरोग्य केंद्राचा लाभ अनेक नागरिक घेतात. त्यांना चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे. - दिनकर पोवार
कचरा गटारीतच
वेळच्यावेळी कचरा उठाव होत नसल्याने अनेकजण कचरा गटारीत टाकतात. गटारी तुंबण्याचे प्रमाण वाढले आहे. नियमित कचरा उठाव व्हावा. - बजरंग नीळकंठ
नागरी समस्या सोडवाव्यात
निवडणूक जवळ आली की, लोकप्रतिनिधी गावाला भेट देतात. मात्र, निवडणूक झाली की कोणीही फिरकत नाही. नागरी समस्या सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. - रामचंद्र पोवार
स्वच्छतागृह हवे
शाळेच्या परिसरात स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांची मोठी कुंचबणा होते. या ठिकाणी स्वच्छतागृह होणे गरजेचे आहे. - सचिन पाटील
बंधाऱ्यातील गाळ काढावा
गाव बंधाऱ्यातील गाळ कित्येक वर्षे काढलेला नाही. तो काढून त्या ठिकाणी महिलांना कपडे धुण्यासाठी घाटाची सोय करावी.
- दीपक रेडेकर
मंडईतील कचरा उठाव
डफळे कॉलनीत असलेल्या भाजी मंडईतील कचरा उठाव ही मोठी समस्या बनली आहे. या ठिकाणचा कचरा उठाव करण्यासाठी नियोजन करावे.
- आनंदा पोवार
गावतळ्याचे अस्तित्व लोप
गावभाग तळ्याचे लाखो रुपये खर्च करून सुशोभीकरण केले होते, परंतु गावतळ्याचे अस्तित्व लोप पावले आहे. त्याकडे लक्ष दिले पाहिजे. - नामदेव वार्इंगडे


बगीचा व्हावा
गावची सुमारे ५० हजारांहून अधिक असलेली लोकसंख्या पाहता लहान मुले, ज्येष्ठांसाठी बगीचा व्हावा. अंतर्गत रस्ते चांगले करावेत.
- स्वाती यादव
क्रीडांगण व्हावे
खेळाडूंना सरावासाठी शहरात जावे लागते. ते टाळण्यासाठी गावातच क्रीडांगण होणे आवश्यक आहे.
- राजलक्ष्मी पोवार
नगरपालिका व्हावी
उचगाव गावात लोकसंख्या विचार घेता नगरपालिका होण्यासाठी राजकीय पक्षांनी विचार करणे गरजेचे आहे. तसेच लोकसंख्येच्या प्रमाणात ग्रामपंचायतीला अनुदानांची गरज आहे.
- दीपाली सातपुते
विकासासाठी एकत्र यावे
गावाच्या विकासासाठी प्रत्येकाने गट-तट विसरून एकत्र येणे गरजेचे आहे. कारण मूळ गावाव्यतिरिक्त उपनगर वाढत असल्याने गरजेइतक्या सुविधा पुरविणे अशक्य बनले आहे.
- मधुकर चव्हाण, माजी सरपंच

Web Title: Garden, sports carport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.