गारगोटी-कडगाव महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:24 AM2021-05-18T04:24:08+5:302021-05-18T04:24:08+5:30
गारगोटी : गारगोटी-शिवडाव रस्त्यावर पावसामुळे प्रचंड चिखल व दलदल झाली असून रस्ता वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. दलदलीमुळे ...
गारगोटी : गारगोटी-शिवडाव रस्त्यावर पावसामुळे प्रचंड चिखल व दलदल झाली असून रस्ता वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. दलदलीमुळे संपूर्ण वाहतूक ठप्प होतं असल्यामुळे ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होेत आहे.
गारगोटी कडगाव राज्यमार्गाचे काम पुणे येथील कृष्णाई कंपनीकडून सबलेट करून कोल्हापूरच्या मोहिते कंपनीने नोव्हेंबर २०२० पासून काम सुरू केले. प्रथमतः शिवडावकडील रस्त्याचे काम करण्यात आले. रस्त्याच्या कामाच्या दर्जावरुन लोकांच्या प्रचंड तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा भांडाफोड आमदार प्रकाश आबिटकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश बुरुड यांच्यासमोर केला होता. आमदार आबिटकर तक्रारीनुसार क्वॉलिटी कंट्रोलकडून तपासणी करण्याचा केवळ फार्स करण्यात आला. तरी देखील ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व खासगी कन्सल्टंट यांनी दाबून काम सुरु ठेवले .या मार्गावर या कंपनीने ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे. गारगोटी कडगाव मार्गावरील अनेक मोऱ्यांची कामे अर्धवट स्थितीत ठेवली आहेत. आकुर्डे-शेणगाव दरम्यान रस्ता पूर्णतः खोदला असून पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल व दलदल निर्माण झाली आहे. रस्त्यावरून वाहतूक करताना मोठी कसरत करावी लागत असून चारचाकी वाहन रस्त्यात अडकून पडू लागल्याने वाहने जेसीबीच्या साह्याने ओढून काढावी लागत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना कित्येक तास रस्त्यात अडकून पडावे लागत आहे. मोटारसायकल चालकांना रस्त्यातून जाता येत नाही अशी दयनीय अवस्था झाली असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे एकही अधिकारी इकडे फिरकले नाहीत. त्यामुळे ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या विरोधात वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
फोटो
नवीन सुरू असलेल्या रस्त्यावर दलदल झाल्याने अडकलेली वाहने.