इचलकरंजीत गारमेंट कारखान्याला शॉर्टसर्किटने आग, १ कोटींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 12:44 IST2025-02-12T12:44:21+5:302025-02-12T12:44:40+5:30
इचलकरंजी : येथील विक्रमनगर परिसरातील एका गारमेंट कारखान्याला मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीमध्ये गारमेंटमधील शिलाई मशिन, तयार ...

इचलकरंजीत गारमेंट कारखान्याला शॉर्टसर्किटने आग, १ कोटींचे नुकसान
इचलकरंजी : येथील विक्रमनगर परिसरातील एका गारमेंट कारखान्याला मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीमध्ये गारमेंटमधील शिलाई मशिन, तयार माल व अन्य साहित्य जळून खाक झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत असून, या घटनेत सुमारे १ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशामक दलाने सुमारे पाच तासांच्या परिश्रमाने आग विझवली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गौतमकुमार पुरोहित यांच्या मालकीचा विक्रमनगर परिसरात परकर उत्पादनाचा गारमेंट कारखाना आहे. या ठिकाणी जवळपास ४० मशिन आहेत. पुरोहित यांच्या थोरल्या बंधूंचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने गौतमकुमार हे परगावी गेले होते. त्यामुळे कारखान्यातील माल डिलिव्हरी न झाल्याने मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिला होता. या सर्व मालाची डिलिव्हरी बुधवारी केली जाणार होती. तोपर्यंत मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गारमेंट कारखान्यातून धूर येत असल्याचे परिसरातील यंत्रमाग कारखान्यातील कामगारांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती तातडीने गौतमकुमार यांना दिली.
पुरोहित यांनी या घटनेची माहिती याच भागातील त्यांचे मित्र इम्रान मकानदार यांना दिली. त्यांनी काही सहकाऱ्यांना गोळा करून घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. अशातही मकानदार व सहकाऱ्यांनी काही प्रमाणात तयार असलेला माल बाहेर काढण्यात यश मिळविले. तसेच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.
इचलकरंजी महापालिका व कुरुंदवाड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु कापडाचा माल असल्याने आग वेगाने पसरत गेली. तब्बल पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेची नोंद करण्याचे काम गावभाग पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत होते.
अग्निशामक गाड्या दुरुस्तीला
इचलकरंजी महापालिकेकडे दोन अग्निशामक गाड्या असून त्यापैकी एक वाहन नादुरुस्त असल्याने एकच गाडी घटनास्थळी आली. त्याबरोबर कुरुंदवाड नगरपालिकेची एक गाडी मिळाली. या दोन गाड्यांनी पाणी मारून आग आटोक्यात आणली. हुपरी, हातकणंगले आणि पंचगंगा साखर कारखाना येथील वाहने दुरुस्तीसाठी गेल्याचे सांगण्यात आले.
पत्रे फोडून महत्त्वाचे साहित्य काढले
कारखान्यात आग लागल्यानंतर तेथील एका खोलीतील महत्त्वाची कागदपत्रे व साहित्य पत्रे फोडून तेथून काढून घेण्यात यश मिळाले. त्यावरून आवक-जावक व शिल्लक माल याची माहिती जमवण्याचे काम सुरू होते.