सावधान! कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप खचतोय

By इंदुमती सूर्यवंशी | Published: November 10, 2022 10:40 AM2022-11-10T10:40:50+5:302022-11-10T13:08:10+5:30

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील महत्त्वाची वास्तू असलेला गरुड मंडप खचत चालला आहे. वर्षानुवर्षे अभिषेकाचे पाणी जमिनीखाली गेल्याने येथील सहा खांब खालून पूर्णतः पोकळ होऊन जमिनीखाली जात आहेत.

Garuda Mandap at Ambabai Temple in Kolhapur is crumbling | सावधान! कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप खचतोय

सावधान! कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप खचतोय

googlenewsNext

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील महत्त्वाची वास्तू असलेला गरुड मंडप खचत चालला आहे. वर्षानुवर्षे अभिषेकाचे पाणी जमिनीखाली गेल्याने येथील सहा खांब खालून पूर्णतः पोकळ होऊन जमिनीखाली जात आहेत. परिणामी खांब आणि छतामध्ये गॅप (दरी) पडून तो वाढत चालल्याने आता छतही हळूहळू खाली येऊ लागले आहे. देवस्थान समितीने वेळीच याची दखल घेतली नाही तर भविष्यात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर: ऐतिहासिक व प्राचिन अंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडप लाकडाचा असून, तो १५ खांबांवर आधारला आहे. गेल्या दहा वर्षांपासून याचे छत आणि खांबांमध्ये अंतर पडत असून अलीकडे जास्त वेगाने हे अंतर वाढत आहे; पण आजवर त्याचे कारण आणि गांभीर्य कळत नव्हते.

काही महिन्यांपूर्वी गरुड मंडपातील संगमरवरी काढल्यावर त्याखाली सर्वत्र अभिषेकाचे पाणीच पाणी दिसले.फरशीखाली चेंबर असेल असे समजून वर्षानुवर्षे अभिषेकाचे पाणी येथेच टाकले जायचे. हे पाणी जमिनीखाली साठून सहा खांब तळातून सडून पोकळ झाले आहेत व जमिनीत रुतत चालले आहेत. त्यामुळे उभे खांब आणि छतावरील आडवे खांब या दोन्हींमध्ये मोठे अंतर पडत आहे. आडव्या खांबांचाही आकार बदलून ते खाली आले आहेत, त्यामुळे छताची मधली बाजू खाली कलली आहे.

पहाटेपासूनचे सगळे अभिषेक येथे पार पडतात. भजन, कीर्तनाचे कार्यक्रम, देवस्थानचे उपक्रम होतात. मोठ्या संख्येने भाविक येथे शांत चित्ताने देवीचे नामस्मरण करतात. त्यामुळे देवस्थानने तातडीने याची दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे.

काय करता येईल

• छत आणि खांबांमध्ये जेवढे अंतर पडले आहे, तेवढ्या अंतरापर्यंत गरुड मंडपाचे खांब व वास्तू जॅकनेवर उचलून घ्यावी लागेल. 
- खाली दगडी फरशी घालून पाया मजबूत करावा लागणार आहे. त्यासह गरुड मंडपाच्या नूतनीकरणासाठी ५५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

असा आहे गरुड मंडप

छत्रपती तिसरे शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत सन १८३८ ते १८४५ दरम्यान गरुड मंडप बांधला गेला. त्याला तीन दालन असून, लाकडी सभामंडप आहे. मोठे लाकडी उभे १५ खांब आणि आडवे खांब यावर हा मंडप उभा असून, नक्षीदार कमानी आहेत. छताला कौलं आहेत. खाली काळ्या दगडाची घोटीव फरशी आहे. येथील दगडी चबुतऱ्यावर श्री अंबाबाईची पालखी विराजमान होते. येथेच गणपतीची प्रतिष्ठापना, अक्षय्य तृतीयेला अंबाबाईची झोपाळ्यातील पूजा बांधली जाते.

वर्षानुवर्षे अभिषेकाचे पाणी साचल्याने गरुड मंडपाचे खांब खराब होऊन जमिनीत खचत आहेत. वास्तूच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हेरिटेज समितीच्या सहमतीने पुरातत्त्व खात्याला पत्र पाठविण्यात येणार आहे.

- शिवराज नाईकवाडे, सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

Web Title: Garuda Mandap at Ambabai Temple in Kolhapur is crumbling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.