राजेंद्रनगरात गॅस सिलिंडरचा स्फोट; दुमजली तीन घरे खाक, खिडकीतून उड्या मारुन महिलांनी स्वता:चा जीव वाचवला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 01:19 PM2022-05-30T13:19:22+5:302022-05-30T14:01:02+5:30
स्फोटात संपूर्ण घरच बेचिराख झाले. काही तासातच होत्याचं नव्हतं झाले. घरातील प्रापंचिक साहित्याचे झालेले नुकसान पाहून कुटुंबातील महिलांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.
कोल्हापूर : राजेंद्रनगरात स्वयंपाक गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याने भडकलेल्या आगीत दोन मजली तीन घरे बेचिराख झाली. आगीत प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. रोकडसह दागिने, घरांचे मिळून अंदाजे २६ लाखांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. सुदैवाने जीवितहानी टळली. आगीत हसीना बादशहा सय्यद यांच्यासह शेजारी योगीता मारुती गुरव,सुनीता महिपती गुरव ही तीन घरे जळाली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, राजेंद्रनगरात मस्जिद गल्लीत हसीना सय्यद यांचे घर आहे. दोन दिवसापूर्वी नातीचा लग्न समारंभ झाला. त्यामुळे नातेवाइकांनी घर भरले होते. त्यांची सून रविवारी सकाळी नाष्टा करण्यासाठी गॅस पेटवत होत्या. दरम्यान,गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. घरातील सर्व मंडळी घाबरून घराबाहेर पडली. घराला आगीने घेरले. स्फोटाच्या आवाजाने परिसरातील नागरिक जमा झाले. अग्निशामक दलाचे तीन बंब व महापालिकेचा एक टँकर मदतीसाठी दाखल झाले. अग्निशमन विभागाच्या जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तासाभरानंतर ही आग अटोक्यात आणली.
घरातील टीव्ही,भांडी,फर्निचरसह सर्व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. घरात मंगल कार्यालयासाठी आणून ठेवलेली तीन लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिन्यांचेही नुकसान झाले. आगीत शेजारी संगीता गुरव व सुनीता गुरव यांच्याही घरातील सर्वच साहित्य जळून खाक झाले. आगीत सुमारे २६ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक इश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार संजय जाधव करीत आहेत.
फक्त अंगावरील कपडेच शिल्लक
आगीत घरातील सर्वच साहित्य जळून खाक झाले. यामध्ये मंगलकार्यासाठी खरेदी केलेल्या नव्या कपड्यांसह तीन लाखाची रोकड जळाली.
महिलांच्या डोळ्यात अश्रुं...
स्फोटात संपूर्ण घरच बेचिराख झाले. काही तासातच होत्याचं नव्हतं झाले. घरातील प्रापंचिक साहित्याचे झालेले नुकसान पाहून कुटुंबातील महिलांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.
महिलांनी खिडकीतून उड्या मारल्या
सय्यद यांच्या घरातील सर्वजण सकाळी विशाळगड दर्शनासाठी जाणार होते. त्यासाठी साहित्य खरेदीसाठी पुरुष मंडळी घराबाहेर पडली होती. घरी पाहुण्या १८ महिला होत्या, आग लागल्यानंतर पहिल्या मजल्यावरील खिडकीतून काही महिलांनी उड्या मारून जीव स्वता:चा वाचवला.