Gas Cylinder price hike: कोल्हापुरात महिलांनी 'पंचगंगेत' फेकल्या गॅस 'सिलिंडरच्या टाक्या'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 05:39 PM2022-05-09T17:39:30+5:302022-05-09T19:12:53+5:30
जीवनावश्यक गॅस सिलिंडरचे दर १०१९ रुपयावर गेले आहेत. त्यामुळे शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्यावतीने महिलांनी हे आंदोलन केलं.
कोल्हापूर : महागाईने जनता अक्षरश: हैराण झाली आहे. केंद्र सरकारने इंधन दरवाढ, खाद्य तेल, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी दरवाढ केली आहे. जीवनावश्यक गॅस सिलिंडरचे दर १०१९ रुपयावर गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. याच्या निषेर्धात आज, सोमवारी सकाळी शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्यावतीने महिलांनी गॅस सिलिंडर टाक्या पंचगंगा नदीत फेकून दिल्या. घाटावर चूल मांडून स्वयंपाकही केला. यावेळी ‘मोदी तेरे देश में सस्ती दारू महंगा गॅस’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
गॅस सिलिंडरचे दर दिवसेंदिवस सर्वसामान्यांचा आवाक्याबाहेर जात आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाच्या अंतर्गत गॅस सिलिंडरचे दरात १६५ रुपयांची वाढ केली. त्यामुळे राज्यासह कोल्हापूरात गॅस सिलिंडर १०१९ रूपयांना झाला आहे. त्यामुळे सर्वसामन्यांनी जगायचे तरी कसे, असा प्रश्न करीत आंदोलनकर्त्या महिलांनी गॅस सिलिंडर थेट पंचगंगा नदीत फेकले. अन्य महिला कार्यकर्त्यांनी नदी घाटावर चूल मांडून तेथेच झुणका भाकरही बनविली. यावेळी उपस्थित महिलांनी केंद्र सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला.
आंदोलनात अशोक पोवार, रमेश मोरे, चंद्रकांत पाटील, विनोंद डुणुंग, शंकरराव शेळके, भाऊ घोडके, महादेव जाधव, कादरभाई मलबारी, चंद्रकांत बराले, राजू मालेकर, रामभाऊ कोळेकर,राजू हरवंदे, रमाकांत पवार, रमाकांत आग्रे, जलराज कदम, अंकुश कदम, अंजुम देसाई, अजित सासणे, सुनिता पाटील, रेखा पाटील, आदी सहभागी झाल्या होत्या.