दोन महिन्यांत गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:23 AM2021-09-03T04:23:38+5:302021-09-03T04:23:38+5:30

कोल्हापूर : गॅस सिलिंडरचे दर महिन्याला वाढत असून गेल्या दोन महिन्यांत त्यात ५० रुपयांनी वाढ झाली आहे. एकीकडे कोरोनाने ...

Gas cylinders go up by Rs 50 in two months | दोन महिन्यांत गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग

दोन महिन्यांत गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग

Next

कोल्हापूर : गॅस सिलिंडरचे दर महिन्याला वाढत असून गेल्या दोन महिन्यांत त्यात ५० रुपयांनी वाढ झाली आहे. एकीकडे कोरोनाने झालेले आर्थिक नुकसान, जीवनावश्यक साहित्यांचे वाढते दर यामुळे आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना दर १५ दिवसांनी केली जाणारी ही दरवाढ म्हणजे नागरिकांना सिलिंडरची सवय लावून त्यांच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रकर आहे. केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून सातत्याने गॅस सिलिंडरचे दर वाढत आहेत. सुरुवातील ४०० रुपयांवर असलेला घरगुती गॅस सिलिंडर आता ८८८ रुपयांना झाला आहे. म्हणजे सात वर्षांत तब्बल दुप्पटपेक्षा जास्त रकमेने दर वाढले आहेत. जानेवारीपासून आता आठ महिन्यांत १९१ रुपयांनी सिलिंडरचा दर वाढला आहे. आधीच गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या, व्यवसायाचे नुकसान झाले, हातावरचे पोट असलेल्यांचा रोजगार थांबला. ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्याने स्मार्ट फोनवरचा खर्च वाढला. सगळीकडून अशी आर्थिक कोंडी झाल्याने सर्वसामान्यांची एवढ्या कमी रकमेत घरखर्च भागवताना तारेवरची कसरत होत आहेत. सिलिंडर ही अत्यावश्यक बाब असल्याने त्यावर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत पैसा घालवावा लागतो.

-----------

महिना : सिलिंडरचे दर

जानेवारी : ६९७

४ फेब्रुवारी : ७२२

१५ फेब्रुवारी : ७७२

२५ फेब्रुवारी : ७९७

मार्च : ८२२

एप्रिल : ८१२

जुलै : ८३८

१७ ऑगस्ट : ८६३

१ सप्टेंबर : ८८८

---

सबसिडी झाली बंद

दीड वर्षापूर्वीपर्यंत शासनाकडून गॅस सिलिंडरवर सबसिडी दिली जात होती. ग्राहकाकडून नियमाने पैसे घेतले जात होते. पण सबसिडीची रक्कम खात्यावर जमा केली जात होती. पण आता तीदेखील बंद झाल्याने ग्राहकांना सिलिंडरसाठी पूर्ण पैसे मोजावे लागतात.

--

पूर्वी घराघरांत चुली होत्या. तेव्हा सरकारने गाजावाजा करत महिलांना आम्ही धुरापासून मुक्त करत आहोत, पर्यावरणाचे रक्षण करूया, असं म्हणत उज्वला गॅस योजना सुरू केली. घराघरांत गॅस सिलिंडर आला, चुली पेटवायच्या बंद झाल्या. लोकांना गॅसवर स्वयंपाकाची सवय लावली आणि आता दरवाढ करून पैसे उकळले जात आहेत.

-संगीता दुगाणी, मगदूम कॉलनी, पाचगाव

---

गॅस सिलिंडरही जीवनावश्यक वस्तू आहे, रोज ते पेटवल्याशिवाय घरात अन्न शिजत नाही, याची जाण ठेवून सरकारने गॅस सिलिंडरचे दर कमी ठेवले पाहिजे. उलट दर महिन्याला ते वाढवून सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पाडली आहे. आधीच कोरोनाने आर्थिक आरिष्ट्य आलेले असताना दोनवेळचा घासपण महाग करून ठेवला आहे, कसं जगायचं सर्वसामान्यांनी.

-सुनेत्रा चनवर, साळोखेनगर

--

Web Title: Gas cylinders go up by Rs 50 in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.