नऊ महिन्यांत १३८ रुपये गॅस दरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:45 AM2021-02-06T04:45:42+5:302021-02-06T04:45:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्ती देण्यासाठी घरोघरी गॅस योजना राबवणाऱ्या केंद्र शासनाने गेल्या नऊ महिन्यांत ...

Gas price hike of Rs 138 in nine months | नऊ महिन्यांत १३८ रुपये गॅस दरवाढ

नऊ महिन्यांत १३८ रुपये गॅस दरवाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्ती देण्यासाठी घरोघरी गॅस योजना राबवणाऱ्या केंद्र शासनाने गेल्या नऊ महिन्यांत १३८ रुपयांनी या इंधनाची दरवाढ केली आहे. आता पुन्हा जाहीर केलेली दरवाढ पाहता, भविष्यात सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा चुलीकडेच वळावे लागेल की काय, अशी स्थिती आहे. मे महिन्यात ५८४ रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर सध्या ७२२ रुपयाला मिळत असून, यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे.

ग्रामीण भागातील महिलांना चुलीपासून मुक्ती मिळावी, त्यांचा वेळ वाचावा म्हणून ‘उज्वला गॅस योजना’ राबविण्यात आली. या योजनेनंतर अपवाद वगळता आता घराघरांमध्ये गॅसवर स्वयंपाक केला जातो. सुरुवातीला गॅसवर अनुदान देण्यात आले, शिवाय कमी दर असल्याने सिलिंडर सर्वसामान्यांना परवडत होता. आता मात्र घराघरात गॅस देऊन सिलिंडरच्या दरात मात्र वाढ करण्यात आली. शिवाय अुनदानही मे महिन्यापासून बंद करण्यात आले.

गेल्या नऊ महिन्यांत गॅस सिलिंडरच्या दरात चारवेळा वाढ करण्यात आली. मे महिन्यात ५८४ रुपये दर असलेला सिलिंडर सध्या ७२२ रुपयांना घ्यावा लागत आहे. यामुळे आधीच कोरोनाचा आघात आणि महागाईच्या झळा सोसत असलेल्या नागरिकांसाठी पेट्रोल, डिझेल आणि आता झालेली गॅस दरवाढ हा प्रकार म्हणजे आधीच उल्हास त्यात फाल्गून मास अशी स्थिती झाली आहे.

--

वाढत गेलेला दर असा

महिना दर

मे २०२० : ५८४

जून : ५९५.५

जुलै ते २ डिसेंबर २०२० : ५९७.५

२ ते १४ डिसेंबर : ६४७.५

१५ डिसेंबर ते ३ जानेवारी २०२१ : ६९७.५

सध्याचा दर : ७२२.५ रुपये

---

दर महिन्याला गॅसचा दर वेगवेगळा, सातत्याने वाढणाराच असतो. आता सबसिडीही बंद केली. गॅसवर एवढी मोठी रक्कम खर्च करणे सर्वसामान्यांना परवडत नाही. आधीच कोरोनामुळे नागरिक आर्थिक अडचणीत असताना, दर कमी करण्याऐवजी वाढवणे म्हणजे लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे.

भारती माने (गृहिणी)

--

आधी पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि आता गॅस दरवाढ म्हणजे लोकांनी जगायचं की नाही. आधीच आर्थिक घडी विस्कटलेली असताना, पुन्हा गॅस दरवाढ म्हणजे परवडायचे कसे. आधी लोकांना आश्वासने द्यायची, स्वप्ने दाखवायची आणि त्यांना त्या गोष्टींच्या सवयी लावून नंतर दरवाढ करायची, असा दुटप्पीपणा सरकार करत आहे.

आकांक्षा मगर (गृहिणी)

-

Web Title: Gas price hike of Rs 138 in nine months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.