गॅस अनुदान गुरुवारपासून खात्यावर ‘आधार’ची सक्ती नाही;

By admin | Published: December 30, 2014 12:11 AM2014-12-30T00:11:25+5:302014-12-30T00:15:47+5:30

फक्त बँक खात्यावरही होणार लिंकिंग

Gas subsidy is not compulsory for Aadhaar on Thursday; | गॅस अनुदान गुरुवारपासून खात्यावर ‘आधार’ची सक्ती नाही;

गॅस अनुदान गुरुवारपासून खात्यावर ‘आधार’ची सक्ती नाही;

Next

कोल्हापूर : ग्राहकांच्या बँक खात्यावर गॅस सिलिंडरचे थेट अनुदान जमा करण्याची रखडलेली योजना केंद्र सरकारने पुन्हा सुरू केली आहे. तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर जिल्हा असून, त्याचे प्रत्यक्ष अनुदान गुरुवार (दि. १)पासून गॅस ग्राहकांच्या खात्यावर जमा होणार आहे. जिल्ह्यातील २ लाख ३५ हजार ग्राहकांचे लिंकिंग झाले असून, हे काम ३० टक्क्यांहून अधिक झाले आहे. जिल्ह्यातील एकूण गॅस ग्राहकांची संख्या ६ लाख २३ हजार इतकी आहे. गतवर्षी काँग्रेस आघाडी सरकारने गॅस सिलिंडरचे अनुदान ग्राहकांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला होता. बॅँक खाते व आधारकार्ड यांचे लिंकिंग झाल्याशिवाय हे अनुदान जमा होत नव्हते, परंतु मधल्या काळात आधारकार्डचाच गोंधळ असल्यामुळे या खात्यांचे लिंकिंग करण्यात अनेक अडचणी आल्या. जिल्ह्यातील २५ टक्के गॅस ग्राहकांचे बॅँकेशी लिंकिंग झाले होते. यापैकी काही खात्यांवर अनुदानाची रक्कमही जमा झाली. डिसेंबर २०१३ ते जानेवारी २०१४ या काळात ही प्रक्रिया सुरू होती. काहींच्या खात्यांवर लिंकिंग होऊनही अनुदान जमा झाले नव्हते. एकंदरीत या योजनेबाबत गोंधळ सुरू होता. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन काँग्रेस सरकारने ही योजना थांबविली. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने पुन्हा ही योजना सुरू केली आहे. प्रातिनिधिक स्वरूपात देशातील ५४ जिल्ह्यांत ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यासह उर्वरित सर्व जिल्ह्यांचे काम सुरू होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आतापर्यंत सुमारे २ लाख ३५ हजार गॅस ग्राहकांचे बॅँकेशी लिंकिंग झाले असून, या ग्राहकांच्या बॅँक खात्यावर गुरुवारपासून अनुदानाची रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे. जसजसे लिंकिंग होईल, तसतसे संबंधितांच्या खात्यावर ही अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. तोपर्यंत हे ग्राहक सध्याच्या अंदाजे ४६५ रुपयांप्रमाणे गॅस सिलिंडर खरेदी करू शकणार आहेत. जानेवारी महिन्यातील दर हे त्या महिन्यातील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या दरानुसारच असतील. शेअर मार्केटप्रमाणे ते दर महिन्याला बदलत राहतील. या संदर्भातील नवीन प्रोग्रॅम सर्व कंपन्यांना बुधवार (दि. ३१)पर्यंत येणार आहे. त्यानुसार गुरुवारपासून कार्यवाहीला सुरुवात होणार आहे. ‘आधार’ची सक्ती नाही आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली नाही. आधारकार्डशिवाय निव्वळ बँक खात्यावरसुद्धा हे अनुदान ग्राहकांना मिळू शकणार आहे. हे दोन पर्याय सरकारकडून देण्यात आले आहेत. यापैकी एक पर्याय चालू शकतो. या प्रक्रियेसाठी दोन फॉर्म असणार आहेत. पहिला फॉर्म हा आधारकार्डचा, तर दुसरा बॅँक खात्याचा. हे फॉर्म भरून बॅँकेत जाऊन त्या ठिकाणी नोंद करून पुन्हा ते संबंधित गॅस एजन्सीमध्ये जमा करायचे आहेत. त्यानंतरच आपले बॅँक खाते लिंक होणार आहे. जिल्ह्यातील गॅस ग्राहकांच्या बँक खात्यावर गुरुवारपासून अनुदान जमा होणार आहे. त्यासाठी १ डिसेंबरपासून सर्व गॅस कंपन्यांकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या लिंकिंगचे काम ३० टक्क्यांहून अधिक झाले आहे. लवकरात लवकर अनुदान जमा होण्यासाठी लोकांनी यामध्ये पुढे आले पाहिजे. त्यांना संबंधित बॅँकांनीही चांगला प्रतिसाद दिला पाहिजे. बुकिंग होऊन सिलिंडरची डिलिव्हरी झाल्यावर दोन दिवसांनी ही अनुदानाची रक्कम लिंकिंग झालेल्या गॅस ग्राहकांच्या खात्यावर जमा होणार आहे. - संजय कर्वे, सेल्स आॅफिसर, एचपीसी व जिल्हा समन्वयक सर्व गॅस कंपन्या.

Web Title: Gas subsidy is not compulsory for Aadhaar on Thursday;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.