गॅसचे अनुदान आता बँक खात्यावरच

By admin | Published: December 27, 2014 12:11 AM2014-12-27T00:11:52+5:302014-12-27T00:19:42+5:30

नवीन वर्षात अंमलबजावणी : कागदपत्रांची पूर्तता करण्यास तीन महिन्यांची मुदत

Gas subsidy is now on the bank account | गॅसचे अनुदान आता बँक खात्यावरच

गॅसचे अनुदान आता बँक खात्यावरच

Next

कोल्हापूर : घरगुती अनुदानित वापराच्या गॅस सिलिंडरचा योग्य वापर व्हावा आणि पात्र लाभार्थ्यांनाच अनुदान मिळावे, या उद्देशाने जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यातील बीपीसीएल, एचपीसी आणि आयओसी या गॅस कंपन्यांच्या ग्राहकांना अनुदानाची रक्कम त्यांच्या बॅँक खात्यावर जमा केली जाणार असून, त्यासंबंधीचे परिपत्रक जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयास नुकतेच आले आहे. योजनेचा लाभ घेण्याकरिता गॅस ग्राहकांना आवश्यक ती कागदपत्रे गॅस एजन्सीकडे द्यावी लागणार आहेत.
जानेवारी महिन्यापासून थेट ग्राहकाच्या बॅँक खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार असल्याने आणि आता यामध्ये पुढे कोणताही बदल करण्यात येणार नसल्याने त्यासाठीची आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करणे अपरिहार्य झाले आहे. कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता तीन महिन्यांची मुदत दिली आहे. जे पूर्तता करणार नाहीत, त्यांना सवलतीच्या दरात सिलिंडर मिळणार नाही. नवी पद्धत सुरू झाल्यानंतर घरगुती वापराचे सिलिंडर अन्य कारणांसाठी वापरता येणार नाहीत आणि कोणी वापरलेच, तर विना अनुदानित सिलिंडर घ्यावे लागणार आहे.
काँग्रेस आघाडी सरकारने गॅस सिलिंडरचे अनुदान ग्राहकाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आधारकार्डचा गोंधळ असल्यामुळे या खात्यांचे लिंकिंग करण्यात अनेक अडचणी आल्या. जिल्ह्यातील २५ टक्के गॅस ग्राहकांचे बॅँकेशी लिंकिंग झाले होते. यापैकी काही खात्यांवर अनुदानाची रक्कमही जमा झाली. काहींच्या खात्यांवर लिंकिंग होऊनही अनुदान जमा झाले नव्हते. एकंदरीत या योजनेबाबत गोंधळ सुरू होता. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन काँग्रेस सरकारने ही योजना थांबविली.
योजनेच्या माहितीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात जनजागृती करण्यात आली आहे. काही कंपन्यांनी मोबाईलवरून एसएमएसद्वारे याबाबत ग्राहकांना माहिती दिली आहे. योजनेमध्ये काही बदल करण्यात आले असून, आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली नाही. आधारकार्डशिवाय निव्वळ बँक खात्यावरसुद्धा हे अनुदान ग्राहकांना मिळू शकेल. या प्रक्रियेसाठी दोन फॉर्म असणार आहेत. पहिला फॉर्म हा आधारकार्डचा, तर दुसरा बॅँक खात्याचा असून, फॉर्म भरून बॅँकेत जाऊन त्या ठिकाणी नोंद करून पुन्हा ते संबंधित गॅस एजन्सीमध्ये जमा करायचे आहेत. त्यानंतरच आपले बॅँक खाते लिंक होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gas subsidy is now on the bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.