गडहिंग्लजमध्ये नाराजांकडून ‘गशविआ’साठी हालचाली

By admin | Published: October 31, 2016 12:17 AM2016-10-31T00:17:21+5:302016-10-31T00:17:21+5:30

पालिका निवडणूक : शिवसेनेचा पुढाकार; नगराध्यक्षपदावरून वेगळ्या चुलीची शक्यता

GashVia movements from angry at Gadhinglaj | गडहिंग्लजमध्ये नाराजांकडून ‘गशविआ’साठी हालचाली

गडहिंग्लजमध्ये नाराजांकडून ‘गशविआ’साठी हालचाली

Next

 राम मगदूम ल्ल गडहिंग्लज
शिवसेना, रिपाइं, स्वाभिमानी व जनसुराज्य या मित्र पक्षांना सोबत घेऊन गडहिंग्लजच्या राजकारणाला तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न भाजपने चालविला आहे. मात्र, नगराध्यक्षपदाची उमेदवारी कुणाकडे हे ठरण्याआधीच भाजपच्या मोर्चेबांधणीला ‘इनकमिंग-आऊटगोर्इंग’चे ग्रहण लागले. त्यातच भाजपसह सेना व स्वाभिमानीनेही नगराध्यक्षपदासह अन्य जागांची उमेदवारी स्वतंत्रपणे दाखल केली आहे.
नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी भाजपप्रमाणेच सेनेचाही आग्रह आहे. नगराध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने वेगळी चूल मांडल्यास ‘गडहिंग्लज शहर विकास आघाडी’ स्थापन होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास ही निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे.
गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवडणुकीत प्रकाश शहापूरकर व प्रकाश चव्हाण हे दोन गट नाट्यमयरीत्या एकत्र आले. त्यांना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ताकद दिली. त्यानंतर त्या दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश करून गडहिंग्लज पालिकेसह पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत तालुक्यात ‘कमळ’ फुलविण्याची घोषणा केली. त्यादृष्टीने त्यांनी मोर्चेबांधणीही सुरू केली.
शहापूरकर व चव्हाणांच्या आधी चव्हाणांचे सहकारी व जनसुराज्यचे प्रमुख कार्यकर्ते रमेश रिंगणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून पालिका निवडणुकीची सूत्रे आपल्या हाती घेतली. शहापूरकर-चव्हाणांच्या प्रवेशानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वसंत यमगेकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी ‘विनाअट’ प्रवेश केल्याचे शहापूरकरांनी जाहीर केले. मात्र, यमगेकर यांच्या प्रवेशाच्यावेळी भाजपचे शहराध्यक्ष रिंगणे यांच्यासह खुद्द चव्हाण व त्यांचे समर्थक अनुपस्थित होते. त्याचवेळी शंकेची पाल चुकचुकली होती.
दरम्यान, यमगेकरांना भाजपने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. त्याचदिवशी रात्री रिंगणेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळविली. त्यामुळे महाआघाडीचे नेतृत्व करणाऱ्या भाजपला पहिला धक्का बसला. त्यानंतर शिवसेनेनेही नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरील दावा कायम ठेवून सुनील शिंत्रेंची, तर भाजपने गृहीत धरलेल्या ‘स्वाभिमानी’ने अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण यांची उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळेच संभाव्य महाआघाडीच्या नेत्यांसमोरील कटकटी वाढल्या आहेत.
उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सर्व पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवाराची नावे निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केल्यामुळे ‘डमी’ म्हणून वापरण्यात आलेली मंडळी नाराज झाली आहेत. त्यांची मोट बांधून ‘गडहिंग्लज शहर विकास आघाडी’ स्थापन होण्याच्या हालचाली आहे. त्याचे नेतृत्व शिवसेनेच्या शिंत्रेंनी केल्यास नवल वाटण्याचे कारण नाही.
शिंत्रे यांच्यासाठी सेनेचा आग्रह का?
४ प्रा. शिंत्रे हे चंदगड विधानसभेची पोटनिवडणूक लढविलेले कार्यकर्ते.
४ आजरा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान संचालक
४ शिंत्रेंच्यामागे केदारी रेडेकर संस्था समूहाची ‘यंत्रणा’ व ‘पाठबळ’ आहे.
४ उच्च विद्याविभूषित आणि शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ता म्हणून ओळख.
४ लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमदेवारांना शहरात राष्ट्रवादीच्या उमेदवारांपेक्षा अधिक मते मिळाली आहेत.
४गडहिंग्लज विभागातील शिवसेनेची जनआंदोलने आणि जनाधार लक्षात घेऊन नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी, असा सेनेचा आग्रह आहे.

Web Title: GashVia movements from angry at Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.