पाटबंधारेचा निष्काळजीपणा उठला राधानगरी धरणाच्या मुळावर, अधिकारी बँकेच्या निवडणुकीत व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 12:27 PM2021-12-30T12:27:27+5:302021-12-30T12:27:58+5:30

दुरुस्तीसाठी उघडलेले गेट मध्येच अडकून धरणातील पाण्याचा विसर्ग झाल्याची घटना म्हणजे पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणाचा कळस ठरली असून, धरणाच्या सुरक्षिततेवरच घाव घातला गेला आहे.

The gate of Radhanagari Dam suddenly opened, Negligence of Irrigation Department | पाटबंधारेचा निष्काळजीपणा उठला राधानगरी धरणाच्या मुळावर, अधिकारी बँकेच्या निवडणुकीत व्यस्त

पाटबंधारेचा निष्काळजीपणा उठला राधानगरी धरणाच्या मुळावर, अधिकारी बँकेच्या निवडणुकीत व्यस्त

Next

कोल्हापूर : दुरुस्तीसाठी उघडलेले गेट मध्येच अडकून धरणातील पाण्याचा विसर्ग झाल्याची घटना म्हणजे पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणाचा कळस ठरली असून, धरणाच्या सुरक्षिततेवरच घाव घातला गेला आहे. दुरुस्तीसाठीची घाईगडबड मात्र धरणाच्या मुळावर आली आहे. दरम्यान, दुरुस्तीस विलंब लागण्यामागे पाटबंधारेची यंत्रणा गव्हर्न्मेंट सर्व्हंट बॅंकेच्या प्रचारात व्यस्त राहिल्यानेही धरणाच्या दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.

राधानगरी धरण हे नदीवर बांधलेले देशातील पहिले दगडी बांधकामाचे धरण आहे. फेजीवडे येथे भोगावती नदीवर ८.३६ टीमएसी क्षमतेच्या या धरणाचे काम छत्रपती शाहू महाराजांनी १९०७ मध्ये सुरू केले. पहिल्या महायुध्द काळात ते काम थांबले. पुढे छत्रपती राजाराम महाराजांनी इंग्रजांच्या मदतीने या धरणाचे काम पूर्णत्वास नेले. स्वातंत्र्यानंतर १९५७ मध्ये त्याचे लोकार्पण झाले. अतिशय भक्कम आणि स्वयंचलित दरवाजांचे तंत्रज्ञान असलेले हे देशातील एकमेव असे धरण आहे. एवढी भक्कमता असूनही केवळ शासकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे धरणाच्या सुरक्षिततेला सुरुंग लावण्याचे प्रकार आतापर्यंत बऱ्याच वेळा घडले आहेत. बुधवारी घडलेली सर्व्हिस गेटची घटना ही त्याचाच नमुना होती.

पाटबंधारेची सर्वच यंत्रणा गव्हर्मेंट सर्व्हन्ट्स बँकेच्या निवडणुकीत व्यस्त राहिल्याने दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. स्वत: पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर हे सत्तारूढ आघाडीचे उमेदवार होते. धरणाच्या गेटच्या दुरुस्तीचे काम शाखा व उपअभियंता यांच्यामार्फत इस्टिमेट आल्यानंतर लगेच सुरू केले जाते, पण या दोघांनाही निवडणुकीच्या कामात घेण्यात आले होते. तेथील सर्वच कर्मचाऱ्यांना प्रचारासाठी गावे वाटून देण्यात आली होती. निवडणुकीचा निकाल आठवडाभरापूर्वी जाहीर झाल्यानंतर पाटबंधारे विभागाला या धरणाच्या दुरुस्तीच्या कामाची आठवण झाली. यानंतर लगेच निविदा प्रक्रिया राबवून घाईगडबडीने काम पूर्ण करण्यास सुरुवात झाली. ही गडबडच धरणाच्या मुळावर उठली आहेे.

माहिती देण्यासाठी टाळाटाळ

सर्व्हिस गेटच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी किती खर्च होतो, गेट साखळीने का बांधून ठेवले आहे, याबाबतची माहिती वाकरे येथील संजय पाटील यांनी पाटबंधारे विभागाकडे माहितीच्या अधिकारातून मागवली होती, पण माहिती देणे दूरच, पाटबंधारे अधिकाऱ्यांनी ३२ हजार रुपये कागदपत्रांसाठी खर्च येईल, असे सांगून ती देणे टाळले. यानंतरही पाटील यांनी पाठपुरावा केला, तरी माहिती दिलीच नाही.

२०१९ मध्येही घडला होता प्रकार

सर्व्हिस गेटच्या बाबतीत घडलेली ही घटना पहिली असली तरी गेटमधून पाणी अचानक बाहेर पडून वीजनिर्मिती केंद्रात घुसून २०१९ मध्ये मोठा स्फोट झाला होता. ११० केव्हीचे वीजनिर्मिती संच पूर्णपणे बंद पडले होते.

यापूर्वीही झाली होती दुरुस्ती

दगड, चुना, शिसे यांचा वापर करून बांधलेले राधानगरी धरण हे अतिशय भक्कम आहे. तरीदेखील सुरक्षितता म्हणून याच्या दुरुस्तीचे काम यापूर्वीही हाती घेण्यात आले होते. १९७४ मध्ये सर्वप्रथम धरणाच्या भिंतींना सिमेंट काँक्रिट करून घेण्यात आले. १९८५ मध्ये धरणाच्या बाहेरील बाजूने दगडी बांधकामाचा आधार देण्यात आला. तत्पूर्वी १९८० मध्ये धरण मजबुतीकरण योजना घेण्यात आली. यातील तीन टप्प्यांपैकी दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले, तिसऱ्या टप्प्यात सांडवा पुनर्बांधणी अर्थात रिडल गेटचे काम मात्र अर्धवट राहिले.

तात्पुरत्या दुरुस्तीवर भर

स्वयंचलित दरवाजे खुले होण्याआधी यांत्रिक दारे सुरू करण्याबाबतची व्यवस्था करण्याची सूचना जागतिक बॅंकेनेदेखील केली होती. धरणाच्या सर्व्हिस गेटचे ऑटोमायजेशन करण्याचे कामही अर्धवट राहिले आहे. जलसंपदा विभागाने केलेला प्रस्तावही कागदावरच आहे. दरवर्षी तात्पुरती दुरुस्ती करून वेळ मारून नेली जाते.

दृष्टिक्षेपात धरण

धरणाची लांबी : १०३७ मीटर

धरणाची उंची : ३८.४१ मीटर

पाणी क्षमता : ८.३६ टीएमसी

सिंचन क्षेत्र : ६० हजार हेक्टर

कार्यक्षेत्र : राधानगरी, करवीर, हातकणंगले, शिरोळ, कर्नाटकमधील काही गावे.

Web Title: The gate of Radhanagari Dam suddenly opened, Negligence of Irrigation Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.