मुरगूडमध्ये भरला बालसाहित्यिकांचा मेळा
By Admin | Published: February 28, 2017 12:59 AM2017-02-28T00:59:36+5:302017-02-28T00:59:36+5:30
ग्रंथ प्रदर्शनास गर्दी : मराठी बालकुमार साहित्य संमेलनास प्रारंभ
मुरगूड : मुरगूड (ता. कागल) येथे मराठी साहित्य संमेलन समिती, मुरगूड आणि मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित विभागीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनला शानदार प्रारंभ झाला. श्रीपाद जोशी साहित्य नगरीमध्ये सोमवारी साहित्यिकांचा मेळा भरला होता.
युवराज संभाजीराजे व्यासपीठावर सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि दीपप्रज्वलन करून या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योगपती मोहन गुजर याच्या हस्ते, तर शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन जवाहर शहा यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य अर्जुन कुंभार म्हणाले, बालसाहित्यिकांमधील बालपण जिवंत ठेवूनच बाल साहित्याची निर्मिती केली जाऊ शकते. सध्या बालक टी.व्ही., मोबाईलमध्ये अडकून पडला आहे. त्यामुळे वाचनापासून दूर गेलेल्या मुलांना पुस्तकांजवळ आणण्यासाठी अशा विभागीय साहित्य संमेलनाची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.
संमेलनाध्यक्ष सुभाष विभूते म्हणाले, टी. व्ही. चित्रपटांमधील रंगणाऱ्या परिकथांतून मुलांना बाहेर आणण्याची आवश्यकता आहे. या बालकांच्या मनाचा कल ओळखून त्यांना परिकथेतून वास्तवात आणण्याचे काम साहित्यिक प्रामाणिकपणे करीत आहेत; पण हा लेखक, साहित्यिक मात्र अडचणीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये अशा विभागीय साहित्य संमेलनाची आवश्यकता आहे. सुरुवातीस मराठी बालकुमार सहित्य सभा या संस्थेची अशोक पाटील यांनी ओळख करून दिली. जयवंत हावळ यांनी स्वागत केले. तर प्रास्ताविकातून संमेलनाच्या आयोजनाचा हेतू कलाकार साहित्यिक एम. डी. रावण यांनी सांगितला. यावेळी स्वागताध्यक्ष प्रवीण दाभोळे, डॉ. मा. ग. गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मोहन गुजर, जवाहर शहा, किशोर पोतदार, चंद्रकांत माळवदे, अशोक पाटील, राजन कोणवडेकर, बबन बारदेस्कर, व्ही. डी. पाटील, शिवाजी होडगे, पांडुरंग सारंग, जी. के. पाटील, सुनील देसाई, पी. एस. कांबळे, टी. एस. गडकरी, बी. वाय. पाटील, सुभाष माने, बाळ पोतदार, अशोक कुंभार, रमेश नांदुलकर उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)
दोन पुस्तकांचे प्रकाशन
पुष्पावती दरेकर लिखित ‘श्रावणांकूर’ आणि बालसाहित्यिक बाळ पोतदार लिखित ‘कथास्तु’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
सभागृहाच्या बाहेर विविध स्टॉलवर आयोजित ग्रंथ प्रदर्शन, नाणीसंग्रह आणि शस्त्र प्रदर्शन पाहण्यास गर्दी झाली होती.
भविष्यात दरवर्षी मुरगूडमध्ये अशा पद्धतीचे साहित्य संमेलन भरविण्याचा संकल्प संमेलनाध्यक्ष सुभाष विभूते यांनी बोलून दाखविला.