जास्त लोक जमा झाल्याने माझे महत्त्व वाटत नसेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:25 AM2021-03-23T04:25:30+5:302021-03-23T04:25:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ‘च्या निवडणुकीत विरोधी राजर्षि शाहू आघाडीच्या बैठकीला आपणास निमंत्रण नव्हते. कदाचित जास्त लोक जमा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ‘च्या निवडणुकीत विरोधी राजर्षि शाहू आघाडीच्या बैठकीला आपणास निमंत्रण नव्हते. कदाचित जास्त लोक जमा झाल्याने माझे महत्त्व वाटत नसेल, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली. कोणाच्या मागे फरफटत जाणार नाही, इतर पर्यायही खुले असल्याचे त्यांनी सांगितले.
‘गोकुळ’ निवडणुकीसाठी सोमवारी विरोधी राजर्षि शाहू आघाडीची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून ‘स्वाभिमानी’ व ‘शेकाप’चे नेते यावेळी उपस्थित नव्हते. याबाबत राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता, आपण राजस्थानमध्ये आहे. बैठकीबाबत आपणास निराेप नव्हता. कार्यालयात निमंत्रण आले असेल तर आपणास माहिती नाही. आघाडीच्या घोषणेबाबत फेसबुकवर आपण बघितले. बोलावले नाही तर आपणास फरक पडत नाही. कदाचित जास्त लोक झाल्याने आमचे महत्त्व वाटत नसेल. एक मात्र निश्चित, आम्ही कोणाच्याही मागे फरफटत जाणार नाही. आमच्यासाठी इतर पर्यायही खुले असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
‘शेकाप’ शाहू आघाडीसोबतच राहणार - संपतराव पवार
‘गोकुळ’च्या लढाईत गेली पाच वर्षे ‘शेकाप’ विरोधी आघाडीसोबत आहे. आताही राजर्षि शाहू आघाडीसोबतच राहणार आहे. सोमवारच्या बैठकीबाबत गडबडीत बोलवायला राहिले असतील, असे माजी आमदार संपतराव पवार यांनी सांगितले.