Kolhapur News: मासा बेलेवाडी-बोळावी परिसरात गव्यांचा कळप, रातोरात करतायंत उभे पीक फस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 07:04 PM2023-03-01T19:04:21+5:302023-03-01T19:05:56+5:30
पाण्याची मुबलक सोय, घणदाट जंगल व खाण्यासाठी भरपूर पिके या परिसरात उपलब्ध असल्याने गव्यांचा वावर
शशिकांत भोसले
सेनापती कापशी: मासा बेलेवाडी (ता.कागल) येथील पाझर तलाव परिसरात गव्यांच्या कळपाचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गव्यांकडून रातोरात शेतातील उभे पीक फस्त केले जात आहे. आज, बुधवारी दुपारच्या सुमारास सेनापती कापशी - मुरगुड मार्गावर बेलेवाडी मासा पाझर तलावाकडुन वीस गवारेड्यांचा कळप रस्ता पार करुन हळदवडे कडील जंगलात जाताना शेतकऱ्यांनी पाहिला. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
बाळेघोल येथे गेल्या आठवड्यात लावण केलेला सुमारे एक एकर ऊस गव्यांनी रात्रीत फस्त केला होता. वनविभागाच्यावतीने नुकसान भरपाई लांबच साधी चौकशीही केली जात नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
शेतकऱ्यांनी नुकत्याच ऊसाच्या लावणी केल्या आहेत, शाळु, गहू, हरभरा पीक आता हातातोंडाशी आलेले आहे. या पार्श्वभूमीवर चिकोत्रा खोऱ्यात वाढलेल्या गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बेलेवाडी मासा, बोळावी, हसुर बुद्रुक, हसुर खुर्द, बाळेघोल, बाळिक्रे व हणबरवाडी येथील डोंगर परिसरात घनदाट जंगल व चार पाझर तलाव आहेत. पाण्याची मुबलक सोय, घणदाट जंगल व खाण्यासाठी भरपूर पिके या परिसरात उपलब्ध आहेत. परिणामी या परिसरात गव्यांनी मोठ्या कळपाने कायमस्वरूपी डेरा टाकला आहे. यामुळे डोंगराजवळ असणारी शेती संकटात सापडली आहे.