गव्यांचे तुळशी खोऱ्यात वास्तव्य, म्हालसवडे परिसरातील शेतीचे केले प्रचंड नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 04:58 PM2021-12-13T16:58:21+5:302021-12-13T16:58:51+5:30
तेरसवाडी पैकी मल्लेवाडी येथील लोळजाई पठारावर तर गव्यांची वस्तीच निर्माण झाली आहे. येथून गव्यांचे वेगवेगळे कळप सातेरी महादेव डोंगर व या परिसरातील वाड्या वस्त्या आणि तुळशी खोर्यातील शेतकर्यांना त्रासदायक ठरू लागले आहेत.
म्हालसवडे : करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील तुळशी खोऱ्यात गेल्या काही दिवसापासून रानगव्यांचा वावर वाढला आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून म्हालसवडे परिसरात गव्यांच्या कळपाने शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. तेरसवाडी पैकी मल्लेवाडी येथील लोळजाई पठारावर तर गव्यांची वस्तीच निर्माण झाली आहे. येथून गव्यांचे वेगवेगळे कळप सातेरी महादेव डोंगर व या परिसरातील वाड्या वस्त्या आणि तुळशी खोर्यातील शेतकर्यांना त्रासदायक ठरू लागले आहेत.
म्हालसवडे येथील गायरानात जंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील घनदाट वनराईत गव्यांचे वास्तव्य असलेले शेतकर्यांच्या निदर्शनास येत आहे. निकम नाळवा, वरपे नाळवा, पटंगाचा माळ, शिंदे नाळवा इथे रोज रात्री गव्यांचे कळप फिरत आहेत. गव्यांनी येथील शेतातील ऊस व शाळू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हेच गवे म्हालसवडे, राशिवडे, सोनाळी व हसुर दुमाला या पंचक्रोशीतील शेतीतून रात्रीचे फिरताना निदर्शनास येत आहेत.
यामुळे पिकांना रात्रीच्या वेळेस पाणी पाजावयास जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या गव्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी नागरिकांतून मागणी होत आहे.
कोल्हापुरातही गेल्या दोन दिवसापासून गव्याने ठाण मांडले आहे. भुयेवाडीत तर या बिथरलेल्या गव्याने एकाचा जीवच घेतला तर चौघे जण जखमी झाले. या गव्याच्या मागावर आता वन विभागाची पथके लागली आहेत. मात्र या पथकांनाही या गव्याने चकवा दिला आहे. त्यामुळे शेवट पर्याय म्हणून वन विभागाने आता या गव्यास बेशुद्ध करुन वनक्षेत्रात सोडण्यासाठी कराडहून प्रशिक्षित कर्मचारी शुटर गनसह कोल्हापुरात दाखल झाले आहेत.
"सकाळी लवकर शेतात गेलो असता अचानक एक गवा अंगावर धावून आला. माझ्या शेतातील दहा गुंठे क्षेत्रातील उसाची लागण गव्यांनी पूर्णतः उद्ध्वस्त केली आहे. या गव्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा. - दिलीप वरपे- शेतकरी (म्हालसवडे )