गव्यास बेशुद्ध करून वनक्षेत्रात सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 11:06 AM2021-12-13T11:06:20+5:302021-12-13T11:08:26+5:30
गवा बिथरलेला असल्याने वनविभागाच्या वतीने गव्यास ट्रॅन्क्युलाइझिंग (बेशुद्ध) करून वनक्षेत्रात सोडणार आहेत. गव्याच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाल्यानंतर वनविभाग खडबडून जागे झाले असून, शोधमोहीम सुरू केली आहे.
शिये : भुयेवाडी (ता. करवीर) येथील नागरिकांवर हल्ला करणारा गवा बिथरलेला असल्याने वनविभागाच्या वतीने गव्यास ट्रॅन्क्युलाइझिंग (बेशुद्ध) करून वनक्षेत्रात सोडणार आहेत. गव्याच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाल्यानंतर वनविभाग खडबडून जागे झाले असून, शोधमोहीम सुरू केली आहे.
गव्याने केलेल्या हल्ल्यात सौरभ खोत याचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बिथरलेल्या गव्यास लोकवस्तीपासून लांब नेण्यासाठी रविवारी वनविभागाच्या वतीने भुयेवाडी, कुशिरे, सादळे मादळे परिसरात वनविभागाने शोधमोहीम चालवली आहे. दरम्यान, भुयेवाडी येथे गव्याने हल्ला केलेल्या ठिकाणाचा पंचनामा वनविभागाच्या वतीने करण्यात आला.
रविवारी सकाळी गायमुख परिसरात गवा दिसल्याने त्याच्या शोधासाठी वनविभागाच्या वतीने सहा टीम तयार केल्या असून, त्यातील चार टीम जंगल भागात शोध घेण्यासाठी, तर दोन टीम परिसरातील गावातील नागरिकांना सतर्क राहण्यासाठी सुचित केल्या आहेत.
गवा दिसल्यास त्यास ट्रॅन्क्युलाइझिंग (तात्पुरता बेशुद्ध) करण्यासाठी कराडहून प्रशिक्षित कर्मचारी शुटर गनसह कुशिरे येथे आले आहेत. गवा दिसल्यास त्यास तात्पुरता बेशुद्ध करून सुरक्षितस्थळी नेणार आहेत. दरम्यान, खोत कुटुंबीयांचे आमदार पी. एन. पाटील, वनविभागाचे अधिकारी यांनी सांत्वन केले. जखमी प्रल्हाद पाटील यांची शस्त्रक्रिया केली असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. भीमराव पाटील यांची प्रकृती चांगली असून, त्यांना घरी आणण्यात आले आहे.
भुयेवाडी येथील युवकावर हल्ला करणारा गवा बिथरलेला असण्याची शक्यता असल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून भुयेवाडी, सादळे, मादळे, कुशीरे, जोतिबा परिसरात गव्याची शोधमोहीम सुरू आहे. या भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आव्हान वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
भुयेवाडी येथे सहा महिन्यांपूर्वी बिबट्यासदृश प्राण्याने श्वानांवर हल्ला केला होता. काल गव्याच्या हल्ल्यात येथील युवकाचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
वारंवार भुयेवाडी येथे वन्यप्राणी येत असून, एका युवकास आपला जीव गमवावा लागल्याने वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारली पाहिजे. - सचिन देवकुळे, सरपंच, भुयेवाडी ग्रामपंचायत