गौराई दिसली... नटून-थटून बसली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 06:16 PM2017-08-29T18:16:08+5:302017-08-29T18:20:03+5:30
कोल्हापूर : ‘गवर आली, पिवळं पितांबर लेवून आली, धन-धान्य घेऊन आली, सुख-शांती आणि समृद्धी घेऊन आली, संपत्ती घेऊन आली, माणिक-मोती घेऊन आली...’ असे म्हणत हळदी-कुंकवाच्या पावलांनी उंबºयाच्या आत आलेल्या गौराईने भाजी-भाकरी खाल्ली, नऊवारी काठापदराची भरजरी साडी, साजश्रृंगाराने नटून-थटून मंगळवारी बालगणेशाच्या शेजारी बसली. तिचे स्वागत करताना सकाळपासूनच कोसळत असलेल्या पावसाचीही तमा न बाळगता सजलेल्या सुवासिनी व कुमारिकांनी पंचगंगा नदीकाठावर फेर धरला.

श्री गणरायाच्या आगमनानंतर चार दिवसांनी मंगळवारी माता पार्वती म्हणजेच गौराईचे घरोघरी मोठ्या उत्साहात आगमन झाले. गौर रानावनात वाढलेली, पानाफुलांत बहरलेली. अशा या गौराईच्या आगमनासाठी मंगळवारी सकाळपासूनच घराघरांत लगबग सुरू झाली. गणेश आगमनाबरोबरच पुनरागमन केलेल्या पावसानेही सकाळपासूनच जोरदार हजेरी लावली.
पहिल्या दिवशी गौराईसाठी घराघरांत बेसनाची, आळूची वडी, शेपू-भोपळीची भाजी-भाकरी अशा नैवेद्याचा ताट सजला. दुपारी बारानंतर पंचगंगा नदीघाट, रंकाळा किंवा घराजवळील जलाशयांजवळ गौरीच्या डहाळ्यांनी सजलेले कलश घेऊन महिला सुवासिनी निघाल्या. येथे पाच खड्यांचे व गौराईचे पूजन आरती करून हळदी-कुंकवाचा कार्यक्रम झाला.
कोल्हापूरच्या जीवनदायिनी पंचगंगेच्या तीरावर नऊवारी साडी, गळ्यात माळा, अंबाड्यात माळलेला गजरा, नाकात नथ असा अस्सल मराठमोळा साजश्रृंगार केलेल्या महिला-मुलींनी भर पावसातही झिम्मा-फुगडीचे खेळ खेळले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
दारात आलेल्या गौराईची दृष्ट काढून भरलेला कलश घरात घेऊन येणाºया कुमारिका सुवासिनीला ‘गवर आली का, काय घेऊन, काय लेऊन आली?’ असे प्रश्न विचारत गृहलक्ष्मीने घरात तिच्या पावलांनी सुख, शांती, समृद्धी, धन-धान्य, ज्ञानबुद्धीची कामना केली. गेल्या चार दिवसांपासून आराशीच्या मध्यभागी आसनस्थ असलेल्या गणरायाशेजारी गौराईची प्रतिष्ठापना झाली.
धूपारती आरती झाल्यानंतर भाजी-भाकरी, दहीभाताचा नैवेद्य दाखविण्यात आला. काही कुटुंबांमध्ये गौरीचे डहाळे, काही ठिकाणी तांब्याचा तांब्या, काहीजणांकडे फक्त गौरीचे मुखवटे आणि काहीजणांकडे उभ्या गंगा-गौरी पूजल्या जातात. प्रत्येक कुटुंबातील प्रथेप्रमाणे गौरीची मांडणी करण्यात आली. भरजरी साड्या आणि अलंकारांनी सजलेल्या गौराईचे रूप जणू दृष्ट लागण्याजोगे होते.
शंकरोबांचे बुधवारी आगमन होणार
गणपती-गौराईनंतर बुधवारी शंकरोबांचे आगमन होणार आहे. गौरी-गणपती आणि शंकरोबा या तिन्ही परिवारदेवतांना बुधवारी पुरणपोळीसारख्या पक्वान्नांचा नैवेद्य दाखविला जाणार आहे. सायंकाळी सुवासिनींसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम केला जातो. यानिमित्त बाजारपेठेत शंकरोबाच्या डहाळ्यांची विक्री केली जात होती.