कारवर लिहिली फॉलोअर्सची नावं, कॅनडास्थित कोल्हापूरचा युट्युबवर गौरव मुडेकर यांच्या कृतीची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 03:44 PM2024-07-03T15:44:23+5:302024-07-03T15:44:48+5:30
कोल्हापुरात केली होती कार तयार
कोल्हापूर : सोशल मीडियाचं जग असं काही वेगळं आहे की इथं कोण काय करेल आणि त्याची जगभरात चर्चा होईल हे सांगता येत नाही. ‘गुलाबी साडी’सारखी अनेक मराठी गाण्यांवर जगभरात रील्स होत असताना अशीच एक वेगळी कृती कोल्हापूरच्या कॅनडास्थित गौरव मुडेकर यांनी केली आहे. त्यांनी आपल्या फॉलोअर्सची नावेच आपल्या लाल रंगाच्या आलिशान कारवर लिहिली आहेत.
विवेकानंद महाविद्यालय आणि केआयटीचे माजी विद्यार्थी असलेले गौरव हे उच्च शिक्षणासाठी कॅनडाला गेले आणि तेथेच सध्या ते नोकरी करतात. त्यांचे युट्युबवर ५० हजार फॉलोअर्स आहेत. अफलातून कल्पना लढवून सोशल मीडियावरील फॉलोअर्सची नावं स्वतःच्या आलिशान चारचाकीवर लिहिली आहेत. साेशल मीडियावरील चाहत्यांना गौरव यांनी सन्मान दिला आहे.
कमला कॉलेजच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर आणि एलआयसीचे विकास अधिकारी बी. आर. मुडेकर यांचे गौरव हे चिरंजीव आहेत. एका खासगी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर असलेले गौरव सोशल मीडियावर कॅनडातील लाइफस्टाइल, पर्यटन स्थळे, खाद्यसंस्कृतीचे ब्लॉग आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून प्रसारित करतात.
कोल्हापुरात केली होती कार तयार
गौरव यांना गाड्यांची हौस असल्याने त्यांनी केआयटीला प्रकल्प म्हणून गो कार्टिंगची कार तयार केली. मोहिते रेसिंगवरील शर्यतीत ती उतरवून नंबर मिळवत तब्बल १ लाखांचे बक्षिसही मिळवले होते.