सुनील शिंदे यांचा नाट्य परिषदेकडून गौरव
By admin | Published: November 17, 2015 12:13 AM2015-11-17T00:13:31+5:302015-11-17T00:25:52+5:30
सलग पाच वर्षे राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांच्या नाटकांनी पारितोषिके पटकावली
कोल्हापूर : अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे दरवर्षी रंगभूमीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंगकर्मींना पुरस्काराने गौरविण्यात येते. बालरंगभूमीकरिता योगदान दिलेले कोल्हापूरच्या शिंदे अकॅडमीचे संस्थापक व दिग्दर्शक सुनील शिंदे यांना यावर्षी हा पुरस्कार जाहीर झाला होता. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या हस्ते शिंदे यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
संबंधित पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम ८ नोव्हेंबरला गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनी माटुंगा (मुंबई) येथील यशवंत नाट्य संकुलात झाला. यावेळी मावळत्या नाट्य संमेलनाध्यक्षा फैयाज, नूतन संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर, नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, नाट्यनिर्मात्या लता नार्वेकर, दीपक करंजीकर, विजय कदम, मंगेश कदम, प्रफुल्ल महाजन, आदी उपस्थित होते. दरम्यान, दिग्दर्शक सुनील शिंदे हे १९८३ पासून रंगभूमीवर कार्यरत आहेत. पंडित सत्यदेव दुबे, दामू केंकरे, माधव वाटवे, प्रकाश बुद्धिसागर यांच्या कार्यशाळेतून त्यांनी प्रशिक्षण घेतले. रंगभूमीवरील अनेक नाटकांत अभिनय, तंत्रज्ञ, दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केले आहे. चाळीसहून अधिक पारितोषिक प्राप्त एकांकिकांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. सन २००१ मध्ये त्यांनी शिंदे अकॅडमीची स्थापना केली. त्याद्वारे ते रंगभूमीवर कार्यरत झाले. गेल्या १५ वर्षांत त्यांनी ३३ बालनाट्यांची निर्मिती केली आहे. सलग पाच वर्षे राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांच्या नाटकांनी पारितोषिके पटकावली आहेत. प्राथमिक फेरीत सांघिक व दिग्दर्शन प्रथम क्रमांकाची त्यांनी हॅट्ट्रिक केली आहे. प्राथमिक व अंतिम फेरीत दिग्दर्शनाची सलग दहा आणि प्रकाशयोजनाची पाच पारितोषिके त्यांनी पटकावली आहेत. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन त्यांना नाट्य परिषदेने पुरस्काराने सन्मानित केले आहे. (प्रतिनिधी)