गावठाण मिळकतींची मोजणी आता होणार ‘ड्रोन’द्वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 01:45 AM2019-06-09T01:45:00+5:302019-06-09T01:45:31+5:30
आता गावठाणांमधील मिळकतींची मोजणी ड्रोनद्वारे होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भूमीअभिलेख कार्यालयाकडून गावठाणांच्या हद्दी निश्चित करण्याचे काम सुरू केले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील ८३६ गावांमध्ये ‘ड्रोन’द्वारे मोजणीला सुरुवात होईल.
प्रवीण देसाई ।
कोल्हापूर : आता गावठाणांमधील मिळकतींची मोजणी ड्रोनद्वारे होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भूमीअभिलेख कार्यालयाकडून गावठाणांच्या हद्दी निश्चित करण्याचे काम सुरू केले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील ८३६ गावांमध्ये ‘ड्रोन’द्वारे मोजणीला सुरुवात होईल. यामुळे वेळ वाचणार आहेच, शिवाय हद्दीमुळे होणारे वादाचे प्रकारही कमी होण्यास मदत होणार आहे.
गावाची वाढती लोकसंख्या, विकासाच्या योजना, यामुळे गावात भौगोलिक बदल होत असून, जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया वेगाने सुरूआहे; परंतु ग्रामीण भागात गावठाणाचे अभिलेख नसल्याने नेमकी जागा किती आहे? याबाबत सुस्पष्टता नसते. गावठाणामधील बांधकाम परवाने देण्याचे अधिकार योग्य पद्धतीने हाताळण्याकरिता जागेचा नकाशा व गावठाणाचे भूमापन असणे गरजेचे आहे. मालमत्तेचे मालकीपत्र नसल्याने आर्थिक पतही निर्माण होत नाही; त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी मिळकतींची मोजणी करण्याचे काम शासनाने सुरूकेले आहे. ही प्रक्रिया जलद होण्यासाठी ‘ड्रोन’द्वारे मोजणी केली जाणार आहे. पथदर्थी प्रकल्प म्हणून सोनार्ली (जि. पुणे) येथे राबविला. राज्यभरातील ४० हजार गावांत ही योजना राबविण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दोन महिन्यांंत काम सुरू होणार आहे.
अशी असणार रचना
सुरुवातीला गावांची पाहणी करून ड्रोनद्वारे मोजणीसंदर्भातील माहिती ग्रामसभेद्वारे ग्रामस्थांना देणे
गावाची निवड केल्यानंतर ‘ड्रोन’साठी ग्राऊंड कंट्रोल पॉइंट प्रस्थापित करणे.
ड्रोनद्वारे गावाची ‘इमेज’ घेण्यापूर्वी रस्ते व मिळकत यामधील सीमा चुना पावडरने आखणे
ड्रोनमध्ये मिळकतीची हद्द स्पष्टपणे दिसावी, यासाठी ती हद्द चुना वापरून आखून घेणे.
२४ मिनिटांत मोजणी
ड्रोनद्वारे मोजणीस २४ मिनिटांचा कालावधी लागणार आहे. यामुळे वेळ वाचणार आहेच, त्याशिवाय अचूकता येणार आहे. जिल्ह्यासाठी तीन कॅमेरे देण्यात येणार आहेत. छायाचित्र डाऊनलोडची प्रक्रिया सर्व्हे आॅफ इंडियाच्या डेहराडून येथील मुख्यालयात आहे.
ड्रोन मोजणीचे फायदे
पारंपरिक मोजणी पद्धतीपेक्षा ड्रोन पद्धती कमी वेळेत, कमी श्रमात, कमी मनुष्यबळाचा वापर करून होते
ड्रोन इमेजमुळे कामात पारदर्शकता व अचूकता येते
३ डी इमेज प्राप्त होत असल्यामुळे विविध विकासयंत्रणा व विभागांना नियोजन करताना सुलभता येते.
दोन वर्षांत काम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ ही घेण्यात येणार आहे. यामध्ये आय. टी. आय.चे विद्यार्थी, स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या तरुणांनाही सामावून घेतले जाणार आहे.
ड्रोनने मोजणीची गावे
करवीर ७९
कागल ४३
गडहिंग्लज ५५
आजरा ७७
चंदगड १३७
राधानगरी ९०
भुदरगड १००
गगनबावडा ४०
पन्हाळा ८२
शाहूवाडी १२२
शिरोळ ०४
हातकणंगले ०७
एकूण ८३६
गावठाणातील मिळकतींची ड्रोनद्वारे मोजणीचा निर्णय महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. जिल्ह्यात एकाचवेळी सर्व तालुक्यांत येत्या दोन महिन्यांत हे काम सुरू करण्यात येणार आहे. त्याकरिता अतिरिक्त मनुष्यबळही घेण्यात येणार आहे.
- वसंत निकम, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, कोल्हापूर