गवारी, ओला वाटाणा कडाडला, बहुतांशी भाज्या ८० रुपयांच्या पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 04:46 PM2020-08-03T16:46:44+5:302020-08-03T16:48:32+5:30
लॉकडाऊननंतरच्या पहिल्या आठवड्यात भाज्यांनी चांगलीच उसळी घेतली आहे. किरकोळ बाजारात गवारी व ओला वाटाणा कडाडला असून, बहुतांश भाज्या ८० रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. साखर, सरकी तेलासह कडधान्य मार्केट मात्र अद्याप शांतच दिसत आहे.
कोल्हापूर : लॉकडाऊननंतरच्या पहिल्या आठवड्यात भाज्यांनी चांगलीच उसळी घेतली आहे. किरकोळ बाजारात गवारी व ओला वाटाणा कडाडला असून, बहुतांश भाज्या ८० रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. साखर, सरकी तेलासह कडधान्य मार्केट मात्र अद्याप शांतच दिसत आहे.
श्रावण सुरू झाल्यापासून भाज्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दर तेजीत आहेतच; मात्र या आठवड्यात भाज्या जरा जास्त कडाडल्या आहेत. किरकोळ बाजारात गवारी १२० रुपये, तर ओला वाटाणा १६० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.
आज, श्रावणातील दुसरा सोमवार असल्याने रविवारी भाज्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली. पावसाने उघडीप दिल्याने, भाजीपाल्याची आवक चांगली असल्याने घाऊक बाजारात पुरेसा माल उपलब्ध आहे. मात्र मागणी वाढल्याने मालाला तेजी आली आहे. किरकोळ बाजारात तर बहुतांश भाज्यांचे दर ८० रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. सर्वांत कमी ४० रुपये किलो फक्त टोमॅटो आहे.
श्रावण महिना हा सणासुदीचा असला तरी ग्रामीण भागात लोकांच्या हातात पैसे नाहीत. त्यामुळे कडधान्य मार्केटमध्ये काहीशी शांतता दिसते. किरकोळ बाजारात साखर ३७ रुपये तर सरकी तेल १०० रुपये किलो आहे. श्रावणात उपवासासाठी लागणारी शाबूचे दरही यंदा ७० रुपयांवर स्थिर राहिले आहेत.
शेंगदाणा १०० रुपये तर तूरडाळ १०० व हरभराडाळ ६० रुपये किलोपर्यंत आहे. आवक चांगली असली तरी त्या पटीत मालाचा उठाव होत नाही. फळबाजारामध्ये सध्या सफरचंद, सीताफळ, डाळींब, माल्टा, केळींची रेलचेल दिसते. सफरचंद १०० पासून २५० रुपये किलोपर्यंत आहेत. केळीची मागणी अधिक असल्याने ४० रुपये डझन दर राहिला आहे.
कांदा घसरला!
घाऊक बाजारात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात १० पासून १५ रुपयांपर्यंत चांगला कांदा मिळत आहे. बटाट्याचा दरही २० ते २५ रुपयांवर स्थिर आहे.
किरकोळ बाजारात भाज्यांचे दर प्रतिकिलो असे -
वांगी (८०), टोमॅटो (४०), ओली मिरची (८०), ढबू (८०), घेवडा (८०), गवार (१२०), ओला वाटाणा (१६०), कारली (६०), भेंडी ( ६०), वरणा (८०), दोडका (६०), कांदा (१२), बटाटा (२०), साखर (३७), तूरडाळ (१००), हरभराडाळ (६०), मूगडाळ (१२०), मूग (१००), मटकी (१२०), शाबू (७०), शेंगदाणे ( १००), सरकी तेल (१००), मेथी ( २० पेढी), कोथिंबीर (२०).