‘जीडीपी’वाढीसाठी प्रक्रिया उद्योगाला ‘बळ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:44 AM2019-01-28T00:44:43+5:302019-01-28T00:44:47+5:30
गणेश शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : देशाचा जीडीपी उत्पादन प्रक्रिया आणि विक्री यांवर अवलंबून असून, उत्पादन क्षेत्रात ...
गणेश शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : देशाचा जीडीपी उत्पादन प्रक्रिया आणि विक्री यांवर अवलंबून असून, उत्पादन क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योगांना बळकटी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, त्या दृष्टीने रॅँडम पद्धतीने विविध उद्योगांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणातील माहितीनुसार उद्योगांसाठी आराखडा तयार केला जाणार आहे.
कोणत्याही देशाची प्रगती ही आर्थिक विकासदरावर अवलंबून असते. सध्या जगाचा आर्थिक विकास दर ३.५ टक्के, तर देशाचा ७.३ टक्के आहे. दरवर्षी विकासदर वाढतच असतो; पण त्याच्यात किती सक्षमतेने वाढ होते, हे महत्त्वाचे असते. आपला विकास दर ज्या गतीने वाढायला हवा, तो वाढत नाही, ही केंद्र सरकारच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. उत्पादकता, प्रक्रिया आणि विक्री यांवर विकासदर अवलंबून असतो. शेतीतून अपेक्षित उत्पादकता मिळत नाही. नैसर्गिक संकटे आणि बदलणाऱ्या हवामानाच्या फटक्यामुळे शेतीची उत्पादकता कमी झाली आहे. त्याचा परिणाम विकास दरावर दिसत आहे. शेती उत्पादनाबरोबरच आता प्रक्रिया उद्योगावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. प्रक्रिया उद्योगांना बळकटी देण्याचे धोरण सरकारच्या विचाराधीन असून, त्या दृष्टीने सर्वेक्षण सुरू केले आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार अर्थ व सांख्यिकी संचालनालयांतर्गत कोल्हापूर जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने गेल्या तीन वर्षांतील उद्योगांची पाहणी केली जाणार आहे. यामध्ये संबंधित उद्योगांची सगळी माहिती संकलित केली जाणार आहे. उत्पादन कधी सुरू झाले इथपासून नफा-तोटा पत्रकापर्यंत माहिती घेऊन त्यानुसार उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. ही माहिती घेऊन उद्योगाच्या बळकटीसाठी उपाययोजना राबविल्या जाणार आहेत.
ही माहिती घेणार
कारखान्याचा पत्ता, किती वर्षांपूर्वी सुरुवात, उत्पादनाची सद्य:स्थिती, स्थावर मालमत्ता, मनुष्यबळ, भाग भांडवल, कर्जे, कामगार पगार व बोनस, भविष्यनिर्वाह निधी, इतर जोखीम, कच्चा माल, विजेचा वापर, प्रत्यक्ष उत्पादन, उत्पादन खर्च, विक्री व्यवस्था, इतर उत्पादने व सध्याचा स्टॉक.