कोल्हापुरातील गर्भलिंग निदान प्रकरण: महिलांच्या घरी जाऊन करायचा गर्भपात, बोगस डॉक्टरसह दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 11:33 AM2023-02-24T11:33:23+5:302023-02-24T11:33:59+5:30
गुन्ह्यात एकूण १८ संशयितांची नावे निष्पन्न
कोल्हापूर : गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्याप्रकरणी राधानगरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी बुधवारी (ता. २२) रात्री बोगस डॉक्टरसह एजंटला अटक केली. बोगस डॉक्टर विठ्ठल हिंदुराव निकम (वय ३९, रा. सावर्डे दुमाला, ता. करवीर) आणि एजंट संजय आप्पासो गोंधळी (वय ४५, रा. सुळकुड, ता. कागल) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. या गुन्ह्यात एकूण १८ संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, त्यापैकी १४ जणांना अटक झाली असून, चौघांचा शोध सुरू असल्याची माहिती राधानगरी पोलिसांनी दिली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापे टाकून राधानगरी आणि भुदरगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यापैकी राधानगरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात एकूण १८ संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. यातील १२ संशयितांना पोलिसांनी अटक केली असून, बुधवारी रात्री विठ्ठल निकम आणि संजय गोंधळी या दोघांना अटक केली. निकम हा बोगस डॉक्टर आहे, तर गोंधळी हा एजंट म्हणून काम करीत होता. न्यायालयात हजर केले असता दोघांना २८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली.
चौघांचा शोध सुरू
याच गुन्ह्यातील गजेंद्र ऊर्फ सनी बापूसो कुसाळे (रा. शिरसे, ता. राधानगरी), ओंकार कराळे (रा. सडोली, ता. करवीर), राजेंद्र यादव (रा. कारभारवाडी, ता. करवीर) आणि डॉ. प्रसाद ढेंगे (रा. मडिलगे बुद्रुक, ता. भुदरगड) हे चौघे अजून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
घरी जाऊन गर्भपात
बोगस डॉक्टर विठ्ठल निकम याचे १२ वीपर्यंत शिक्षण झाले असून, त्याने एका ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडर म्हणून काम केले आहे. सध्या पन्हाळा तालुक्यातील एका गावात त्याचा दवाखाना आहे. महिलांच्या घरी जाऊन गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात घडवण्याचे काम तो करीत होता, असे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी सांगितले.