कोल्हापूरकरांनी जागवल्या रावत यांच्या भेटीच्या आठवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 12:27 PM2021-12-09T12:27:26+5:302021-12-09T12:30:56+5:30
‘भारतीय लष्करात मराठा पलटणीला अत्यंत मानाचे आणि आदराचे स्थान आहे,’ असे गौरवोद्गार जनरल बिपीन रावत यांनी काढले होते.
कोल्हापूर : तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला बुधवारी अपघात झाला आणि कोल्हापूरमधील अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. दुर्दैवाने संध्याकाळी त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे निधन झाले आणि २०१८ च्या त्यांच्या कोल्हापूर भेटीच्या अनेक आठवणी जागवण्यात आल्या.
३१ ऑक्टोबर २०१८ रोजी तत्कालीन लष्करप्रमुख असलेले बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांनी नव्या राजवाड्यावर शाहू छत्रपती यांची सदिच्छा भेट घेतली आणि मराठा बटालियनच्या कामगिरीच्या आठवणी जागवल्या होत्या. यावेळी त्यांचे ‘शिवाजी द ग्रेट’ची ग्रंथभेट देऊन स्वागत करण्यात आले. शहरातील मान्यवरांसोबत त्यांनी यावेळी शाही भोजनाचा आस्वाद घेतला. यानंतर जनरल रावत यांनी ताराबाई पार्क येथे घरगुती संबंध असलेल्या विक्रांत कदम यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. खासदार संभाजीराजे व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मराठा पलटणीला मानाचे स्थान
- टीए बटालियनच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या माजी सैनिकांच्या मेळाव्यासाठी रावत सपत्नीक कोल्हापूरला आले होते.
- त्यावेळी त्यांनी ‘भारतीय लष्करात मराठा पलटणीला अत्यंत मानाचे आणि आदराचे स्थान आहे,’ असे गौरवोद्गार काढले होते.
- लष्करात सेवा बजावताना अपंगत्व आलेल्या दिव्यांग माजी सैनिकांना यावेळी त्यांच्या हस्ते दुचाकींचे वाटप करण्यात आले. मधुलिका रावत यांच्या हस्ते वीरमाता व वीरपत्नींचा सत्कार करण्यात आला.
आपुलकीने चौकशी
माजी सैनिक, अधिकारी, वीरमाता व वीरपत्नी यांची लष्करप्रमुख रावत यांनी आपुलकीने चौकशी केली तसेच त्यांच्या समस्या जाणून घेत, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी तत्काळ सूचनाही दिल्या. त्यांनी केलेल्या आपुलकीच्या चौकशीने माजी सैनिक भारावून गेले होते.
येथील परिचित विक्रांत कदम यांच्या निवासस्थातून बाहेर पडताना बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांच्यासमवेत छायाचित्र घेण्याची इच्छा व्यक्त केली. रावत यांनी लगेचच आनंदाने त्यांच्यासमवेत छायाचित्र काढून घेतले होते.
२०१७ ला दिल्ली येथे आयोजित केलेल्या शिवजयंती महोत्सवात जनरल रावत मोठ्या अभिमानाने उपस्थित राहिले होते. २०१९ ला पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरात मदतकार्य राबविण्यासाठी मला त्यांचे खूप मोठे सहकार्य लाभले होते. त्यांच्या अशा आकस्मिक व धक्कादायी जाण्याने एक मित्र व मार्गदर्शक गमावल्याची खंत मनाला लागून राहिली आहे. - संभाजीराजे छत्रपती, खासदार