विशेष विद्यार्थ्यांना दिली सर्वसामान्यांची प्रश्नपत्रिका
By Admin | Published: March 17, 2015 11:01 PM2015-03-17T23:01:49+5:302015-03-18T00:03:12+5:30
दहावीच्या परीक्षेत गोंधळ : दोन पेपर कमी
सातारा : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सध्या दहावीची परीक्षा घेतली जात आहे. यामध्ये सातारा येथून आठ विशेष मुलं दहावीच्या परीक्षेला बसली होती. मंगळवारी समाजशास्त्र विषयांचे केवळ सहाच प्रश्नपत्रिका आल्या. त्यामुळे त्यांना सर्वसामान्यांची प्रश्नपत्रिका दिली. यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.याबाबत माहिती अशी की, दहावीच्या परीक्षा सातारा शहरातील विविध केंद्रावर सुरू आहे. यामध्ये सर्वसामान्यांबरोबरच काही विशेष मुलंही परीक्षा देत आहेत. येथील भवानी हायस्कूलच्या केंद्रावर आठ विशेष मुलांचा नंबर आला आहे. समाजशास्त्र विषयाची तयारीही करुन ते परीक्षा केंद्रावर आले. त्यांना उत्तर पत्रिका देण्यात आल्या. त्यानंतर प्रश्नपत्रिकांचे वितरण केले. विशेष मुलं आठ असताना परीक्षा मंडळाकडून केवळ सहाच प्रश्न पत्रिका आल्या. त्यामुळे परिक्षकांनी दोन विद्यार्थ्यांना सर्वसामान्यांची प्रश्नपत्रिका देऊन वेळ मारुन नेली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता. (प्रतिनिधी)
भला मोठा गठ्ठा
सर्वसामान्य व विशेष मुलांच्या परीक्षेत फरक असतो. विशेष मुलांना सर्वसामान्यांपेक्षा केवळ दोन तृतियांश अभ्यासक्रम असतो. तसेच अर्धा तासांचा वेळ वाढवून दिलेला असतो. अशा मुलांच्या हातात सहा सात पानांची प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर त्यांचा गोंधळ उडाला.