राजू शेट्टींच्या मुलाचे दातृत्व, प्रज्ञाच्या शिक्षणाची स्विकारली जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 06:08 PM2020-08-19T18:08:18+5:302020-08-19T18:10:59+5:30
पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फे ठाणे येथील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीनीच्या पुढील शिक्षणासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांचे सुपुत्र सौरभ शेट्टी धावून आले आहेत. त्यांनी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून प्रज्ञा बजरंग घाटगे या विद्यार्थीनीच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारल्यामुळे प्रज्ञाला प्रज्ञावंत होण्यासाठी स्वाभिमानीमुळे पाठबळ मिळाले.
शिरोळ : शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक सामाजिक संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन केले जाते. मात्र, याला छेद देत प्रत्यक्ष मदतीसाठी स्वाभिमानी विद्यार्थी परिषद पुढे आली आहे.
पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फे ठाणे येथील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीनीच्या पुढील शिक्षणासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांचे सुपुत्र सौरभ शेट्टी धावून आले आहेत. त्यांनी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून प्रज्ञा बजरंग घाटगे या विद्यार्थीनीच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारल्यामुळे प्रज्ञाला प्रज्ञावंत होण्यासाठी स्वाभिमानीमुळे पाठबळ मिळाले.
पोर्ले तर्फे ठाणे येथील प्रज्ञा घाटगे या विद्यार्थीनीने दहावी परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवून केंद्रात प्रथम आली. ना वडिलांचा ना आजोबांचा आधार, दोघांचेही निधन झाल्यामुळे घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे आई, आजीच्या रोजगारावर घरखर्च करीत चार बहिण भावंडांसोबत प्रज्ञाचा शैक्षणिक खर्च पेलणे शक्य नाही, ही माहिती समजल्यानंतर प्रज्ञाची शिक्षणाची जिद्द आणि तळमळ पाहून सौरभ शेट्टी यांनी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेमार्फत तिच्या पुढील सर्व शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. प्रज्ञाची भेट घेवून सौरभ यांनी तिचा सन्मान केला.
यावेळी प्रज्ञाने सौरभ यांना राखी देखील बांधली व त्यांनी पुढील शिक्षणाची जबाबदारी मोठ्या भावाप्रमाणे उचलायचा शब्द दिला. शिक्षणाची जबाबदारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विद्यार्थी आघाडीने घेतल्यानंतर प्रज्ञाचे कुटुंबियही भारावले. यावेळी राम चेचर, विक्रम पाटील, तेजस कुलकर्णी, विश्वंभर कुलकर्णी यांच्यासह स्वाभिमानी विद्यार्थी परिषद व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकमतच्या वृत्ताने प्रज्ञाला आधार
प्रज्ञाच्या उच्च शिक्षणासाठी गरीबीचा अडथळा, वडील-आजोबांच्या निधनामुळे घरची परिस्थिती बनली बिकट या मथळ्याखाली ह्यलोकमतह्णने वृत्त प्रसिध्द केले होते. ह्यलोकमतह्णमध्ये आलेली ही बातमी वाचल्यानंतर सौरभ शेट्टी यांनी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर परिषदेच्यावतीने प्रज्ञाच्या शिक्षणाची जबाबदारी उचलून एक नवा अध्याय सुरु केला आहे.
शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या समस्या मांडून त्या सोडविण्यासाठी स्वाभिमानी विद्यार्थी परिषद काम करीत आहे. मेडीकलला प्रवेश घेवून डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रज्ञाच्या सर्व शिक्षणाचा खर्च स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे सगळे भाऊ करणार आहेत.
- सौरभ राजू शेट्टी