खूनप्रकरणी तरुणास जन्मठेप
By admin | Published: January 17, 2016 12:55 AM2016-01-17T00:55:16+5:302016-01-17T00:57:59+5:30
आईसह एक महिला निर्दोष : आईनेच दिली होती मुलाची सुपारी
कोल्हापूर : सुपारी घेऊन अमर वसंत म्हाकवेकर (वय २७, रा. राजेबागस्वार दर्गा, टाऊन हॉलजवळ) याचा खून केल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के. डी. बोचे यांनी शनिवारी गुन्ह्यातील मुख्य आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अमर तानाजी लोखंडे (२४, रा. साळुंखे पार्क, राजारामपुरी) असे त्याचे नाव आहे. मृत अमरची आई सुशीला वसंत म्हाकवेकर (५२), रोशनबी कलंदर मुजावर (भाभी) (३७, रा. शनिवार पेठ) यांनी लोखंडे याला खून करण्यासाठी सुपारी दिली होती. मात्र, आई सुशीला व भाभी रोशनबी यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
अधिक माहिती अशी, रोशनबी भाभी ही अमरला त्याच्या घरी आलेली आवडत नसे. त्यामुळे ती त्याच्यावर चिडून होती. त्यानंतर या तिघांनी त्याला ठार मारण्याचा कट रचला. आरोपी अमर लोखंडे याने १५ जून २०१३ रोजीच्या रात्री दारूमध्ये गोळ्या घालून टाऊन हॉल येथील पिकअप शेडमध्ये गळा आवळून अमर म्हाकवेकर याचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी लोखंडे याला अटक करून चौकशी केली असता त्याने अमरचा खून करण्यासाठी त्याच्या आईने व भाभीने आपणाला २० हजार रुपयांची सुपारी दिली होती, अशी कबुली दिली. त्यानुसार लक्ष्मीपुरी पोलिसांनी लोखंडेसह सुशीला म्हाकवेकर, रोशनबी मुजावर यांना अटक केली.
तत्कालीन पोलीस निरीक्षक पी. डी. पोमण यांनी याप्रकरणी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या घटनेमध्ये प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता. संपूर्ण खटला हा परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित होता. सरकार पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. घटनेदरम्यान शहरात फिरस्त्यांच्या खुनांचे सत्र सुरू होते. त्यामुळे रात्री पोलीस बंदोबस्त होता. कॉन्स्टेबल साजीद शिकलगार यांनी मृत अमर म्हाकवेकर व आरोपी लोखंडे यांना एकत्र पाहिले होते. तसेच महापालिका येथील बिर्याणी गाडीवाला महंमद गौस जहॉँगीर बेग, रिक्षाचालक महंमद काशीम शेख यांनी दोघांना एकत्र पाहिले होते. आरोपीने गुन्ह्यात वापरलेला रुमाल ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथील कोंडाळ्यात रिक्षातून जाताना टाकल्याचे पाहिले होते. पंच साक्षीदार बाळासो रामचंद्र पाटील, इब्राहिम दादू कस्ती, तहसीलदार अनंत गुरव, आदींच्या साक्षी व सरकारी वकील एन. बी. आयरेकर यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी तानाजी लोखंडे याला जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)