हळव्या मनाचा शिस्तप्रिय प्राचार्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:22 AM2021-02-07T04:22:19+5:302021-02-07T04:22:19+5:30

बालपणी सरळ रेषेतील आयुष्य जगता आलं नाही म्हणून कधी कां-कू नाही... मात्र, पुढे चालून स्वत:च्या हिमतीवर आयुष्याचीच रेषा इतकी ...

Gentle-minded disciplined principal ... | हळव्या मनाचा शिस्तप्रिय प्राचार्य...

हळव्या मनाचा शिस्तप्रिय प्राचार्य...

Next

बालपणी सरळ रेषेतील आयुष्य जगता आलं नाही म्हणून कधी कां-कू नाही... मात्र, पुढे चालून स्वत:च्या हिमतीवर आयुष्याचीच रेषा इतकी सरळ बनवली की, त्या रेषेलाच आपल्या प्रवाशाचा हेवा वाटावा... परिस्थितीमुळे बालपणातला जो आनंद आपल्याला घेता आला नाही, तो आनंद गरजवंताच्या आयुष्यात पेरण्यासाठी हा प्रवासी आपलं आयुष्य वेचतो आहे... न थकता... प्राचार्य सूर्यकांत श्रीरंग चव्हाण हे या आनंदयात्रीचं नाव... कोल्हापूर शहरातील नामांकित न्यू एज्युकेशन सोसायटीच्या एस. एम. लोहिया हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजचा हा चिरतरुण प्राचार्य तेथील पावणेचार हजार विद्यार्थ्यांचा अखंड प्रेरणास्रोत बनला, तो त्यांच्या संकटमोचक भूमिकेमुळेच...

आजरा तालुक्यातील आर्दाळ या शे-पाचशे उंबऱ्याच्या खेड्यात बालपण गेलेलं. वडील शेतमजूर; त्यामुळे आपोआपच कष्टप्रद जीवनाची जाणीव बालपणातच मनावर बिंबलेली. चव्हाण यांनी प्राथमिक शिक्षणाचे धडे अर्दाळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतले. कुटुंबाचा गाडा हाकताना वडिलांची होत असलेली कसरत डोळ्यांनी पाहिली असल्याने ही संघर्षाची यात्रा दूर करण्यासाठी शिकण्याशिवाय पर्याय नाही याची जाणीव होतीच. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांच्या नामावलीतच राहण्याचा ध्यास त्यांनी शैक्षणिक प्रवासात शेवटपर्यंत जपला. आठवीनंतर मात्र, आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं. शिक्षणासाठी गावापासून दूर असणाऱ्या गारगोठीच्या शाहूकुमार भवन होस्टेलमध्ये राहत त्यांनी आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतले. आई-वडील, गाव सगळंच दूर. त्यात वय लहान. त्यामुळे आपसूकच दूर असल्याची भावना मनात खोलवर रुजली... मात्र, या परकेपणानेच त्यांच्या कोवळ्या मनाला खंबीर बनवलं. बारी नावाच्या होस्टेलमधील एका मित्राला त्याच्या आजारपणाच्या काळात थेट खांद्यावर घेऊन रुग्णालय गाठणारे हळवे सूर्यकांत या होस्टेलनेच स्वयंशिस्त, जबाबदारी, हळवेपणा अन‌् आपलेपणा दिल्याचे आवर्जून सांगतात. गडहिंग्लजच्या घाळी कॉलेजमधून बी.ए.ची डिग्री हातात पडली. खाकी वर्दीचे भलतेच वेड... काहीही करून पीएसआय व्हायचं हे डोक्यात ठरलेलं. मात्र, डोळ्यांसमोर घर, आई-वडिलांचे कष्ट दिसत होते. लगेच नोकरी मिळवायची असेल तर शिक्षकी पेशा स्वीकारावा लागेल. चव्हाण यांच्या द्विधा मनस्थितीनेच मग बी.एड.चा मार्ग निवडला. कोल्हापुरातील यशवंतराव चव्हाण विद्यालयातून त्यांनी बी.एड. पूर्ण केले. गुणवत्तेच्या जोरावर लगेचच १९८९ मध्ये न्यू एज्युकेशन सोसायटीच्या एस. एम. लोहिया हायस्कूलमध्ये त्यांनी सहशिक्षक म्हणून नोकरीचा श्रीगणेशा केला. विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानल्याने अल्पावधीतच ते सहकाऱ्यांबरोबर विद्यार्थ्यांचेही प्रिय बनले. घराच्या सुखासाठी खाकी वर्दीला मुरड घातलेले शल्य मात्र ते विसरले नव्हते. १९९२ मध्ये नागपूरच्या रामटेकमध्ये एनसीसी अकॅडमीतून प्रशिक्षण घेऊन त्यांनी एनसीसी अधिकारी बनत खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण केले. हे पद त्यांनी नुसतं मिरवलं नाही. या माध्यमातून आपल्या शेकडो विद्यार्थ्यांना घडवत त्यांना आयुष्याची दिशा दिली. त्यामुळेच एक लेफ्टनंट, दोन कॅप्टन तर बहुतांश मेजरपदावर कार्यरत असणारे त्यांचे विद्यार्थी आजही गावाकडे आली की आपल्या गुरूच्या चरणी नतमस्तक होत असतात. ‘एनसीसी’च्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचा सर्वाधिक लाभ आपल्याच विद्यार्थ्यांना मिळवून देण्यात ते अग्रेसर ठरले आहेत. कबड्डीचा राष्ट्रीय पंच म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. लोहिया कॉलेजधील त्यांनी दिलेल्या शैक्षणिक योगदानाची दखल घेत २०१३ मध्ये कॉलेज प्रशासनाने त्यांची प्राचार्यपदी नियुक्ती केली. विशेष म्हणजे स्वत:कडील सर्व कौशल्ये पणाला लावत चव्हाण यांनी या कॉलेजचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रांत लोहिया हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजचा दबदबा निर्माण करण्यात चव्हाण यांची उपयुक्तता मोठी आहे. संस्थेचे विनोदकुमार लोहिया आणि नितीन वाडेकर यांच्या सहकाऱ्यामुळेच हा विकास साधता आल्याचे ते सांगतात. दिवस-रात्र कॉलेज अन तेथील विद्यार्थ्यांचाच विचार डोक्यात ठेवणाऱ्या या अवलियाने गेल्या आठ वर्षांत आठही रजा घेतलेल्या नाहीत हे विशेष. हायस्कूलच्या १२६ कर्मचाऱ्यांत एकवाक्यतेची मनं त्यांनी अशी काही जोडली की सूर्यकांत चव्हाण हे अशाही भाऊगर्दीत संवादाचा आश्वासक पूल बनून राहिले. शिस्तीचा कडक भाेक्ता असलेला हा प्राचार्य अर्ध्या रात्री गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावून जाण्यासाठी मागे-पुढे पाहत नाही. परिस्थितीमुळे मिणमिणत्या दिव्यावर अभ्यास करणाऱ्या आपल्या विद्यार्थ्याला रातोरात लॅम्प घेऊन देणारा... सहलीसाठी पैसे नसलेल्या विद्यार्थ्यांना सहल घडवून आणली तर मदत कोणी केली याचा थांगपत्ता लागू न देणारा हा प्राचार्य एका हाताने केलेल्या मदतीची वाच्यता दुसऱ्या हातालाही कळू देत नाही... स्वत:च्या पगारातील २० टक्के रक्कम वंचितांच्या आयुष्यासाठी खर्ची घालणारे चव्हाण आयुष्यात नियोजन महत्त्वाचे आहे. ते असले की अपयश दूरदूरही शिवत नाही, या मंत्रावरच जीवनाची वाटचाल करीत आहेत. स्वत:च्या आई-वडिलांना आयडॉल मानणाऱ्या या मनाला आईवडिलांनी दिलेल्या संस्कारांच्या शिदोरीमुळेच अर्दाळ ते कोल्हापूर हा प्रवास सुखकर करता आल्याचे समाधान आहे.

Web Title: Gentle-minded disciplined principal ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.