अडीच तालुक्यांचा भौगोलिक विस्तार
By admin | Published: September 23, 2014 12:30 AM2014-09-23T00:30:21+5:302014-09-23T00:47:58+5:30
सिंधुदुर्गला स्पर्शणारी सीमारेषा : गगनबावडा ते आंबोलीपर्यंत विस्तीर्ण मतदारसंघ
संजय पारकर - राधानगरी -संपूर्ण राधानगरी, भुदरगड आणि निम्मा आजरा तालुका असा सुमारे अडीच तालुक्यांच्या मतदारांवर भिस्त म्हणून आकारास आलेला हा राधानगरी-भुदरगड मतदारसंघ होय. १९५२ पासून १९८० पर्यंत सुमारे तीनवेळा मतदारसंघाची चिरफाड करून दुसरा भाग जोडून मतदारसंघ भौगोलिकरीत्या विस्तारलेला आहे. गगनबावड्यापासून आंबोलीला भिडलेल्या या मतदारसंघाची सीमारेषा लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तिन्हींही विधानसभा मतदारसंघाला स्पर्शून जाते. या अवाढव्य विस्तारामुळे येथे प्रत्येक निवडणुकीत आमदारकीची संधी ही नव्या उमेदवाराला मिळते. अपवाद के. पी. पाटील वगळता. ‘के. पी.’नीच फक्त सलग दोन वेळा निवडून येऊन मतदारसंघातील ‘फक्त एकदाच विजयी’ ही परंपरा खंडित केली.
विधानसभेच्या १९५२च्या पहिल्या निवडणुकीत फक्त राधानगरी तालुक्यापुरता हा मतदारसंघ होता. १९५७ मध्ये यात भुदरगड तालुक्याचा समावेश केला. डाव्या विचारसरणीच्या प्रभावामुळे त्यावेळी कम्युनिष्ट पक्षाला फायदा झाला. १९८० च्या फेररचनेत राधानगरी तालुक्यातील संपूर्ण राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील घोटवडे, कौलव, सिरसे, आमजाई व्हरवडे ही गावे वगळून त्यांचा समावेश करवीर तालुक्यातील सांगरूळ मतदारसंघात झाला.
वगळलेला परिसर तसा पूर्वीचा शे.का.प.च्या प्रभावाखाली होता; पण भोगावती साखर कारखान्यामुळे काँग्रेसने येथे चांगले बस्तान बसविले. त्याचा पुढील निवडणुकीवर दुहेरी परिणाम झाला. त्यानंतर एकदाच काँग्रेसला विजय मिळाला. तसेच पाचवेळा काँग्रेसत्तरांना विजय मिळाला. तसेच सहापैकी दोनवेळा राधानगरीतील व चारवेळा भुदरगडमधील उमेदवार विजयी झाले. २००९ मध्ये राज्यात मतदारसंघाची फेररचना झाली. यावेळी राधानगरीतील यापूर्वी वगळलेली गावे पूर्ववत समाविष्ट केली. शिवाय पूर्वीच्या चंदगड मतदारसंघातील आजरा तालुक्यातील आजरा जिल्हा परिषद मतदारसंघ जोडला. त्यानुसार अवाढव्य परिसर सध्याचा मतदारसंघ अस्तित्वात आला. तीन लाखांवर मतदानापैकी निम्म्यांहून जास्त मतदान राधानगरी तालुक्यातील आहे, तर एक लाख दहा हजार भुदरगड व चाळीस हजारांवर आजऱ्यातील मतदान आहे. त्यामुळे मतदारसंघावर मतदारसंख्येनिहाय पहिले, तर राधानगरी तालुक्याचेच प्राबल्य राहिले आहे; पण काँग्रेस अंतर्गत गटबाजीची मोठी बंडाळी या तालुक्यात असल्याने तालुक्याच्या कानाकोपऱ्यांतून आपापला गट सांभाळण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केला. पण, या गटबाजीचा फटका प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांना बसला आहे.
आतापर्यंतच्या तेरा निवडणुकांमध्ये सर्वाधिक पाचवेळा काँग्रेस, तीन वेळा बंडखोर, दोनवेळा शेकाप, तर कम्युनिस्ट व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एक वेळा येथून विजय मिळविला आहे.
आतापर्यंतचे आमदार
१९५२ : डी. एस. आंबेकर
१९५७ : काका देसाई
१९६२ : आनंदराव देसाई
१९६७ : गोविंदराव कलिकते
१९७२ : किसनराव मोरे
१९७८ : दिनकरराव जाधव
१९८० : हरीभाऊ कडव
१९८५ : बजरंग देसाई
१९९० : शंकर धोंडी पाटील
१९९५ : नामदेवराव भोईटे
१९९९ : बजरंग देसाई
२००४ व २००९ : के. पी. पाटील