जॉर्ज फर्नांडीस यांचे गडहिंग्लजशी अतूट नाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 01:00 AM2019-01-30T01:00:42+5:302019-01-30T01:00:46+5:30
गडहिंग्लज : अॅड. श्रीपतराव शिंदे यांच्याशी असलेले मैत्रीचे संबंध आणि विविध सामाजिक चळवळींमुळे जॉर्ज फर्नांडीस यांचे गडहिंग्लजशी अतूट नाते ...
गडहिंग्लज : अॅड. श्रीपतराव शिंदे यांच्याशी असलेले मैत्रीचे संबंध आणि विविध सामाजिक चळवळींमुळे जॉर्ज फर्नांडीस यांचे गडहिंग्लजशी अतूट नाते होते.
१९८६ मध्ये गडहिंग्लज नगरपालिकेच्या डॉ. राममनोहर लोहिया पॅव्हेलियन हॉल व मागासवर्गीय विद्यार्थी वसतीगृहाचे उद्घाटन त्यांच्याहस्ते झाले होते. त्यानंतर त्या ठिकाणी देवदासी मुलांचे वसतीगृह सुरू केले. दरम्यान, कोकणातून मुंबईला जाताना गडहिंग्लजमध्ये आवर्जून थांबून येथील एस. टी. कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला होता. त्यावेळी जुन्या बसस्थानकापासून आयलँड चौकापर्यंत कामगारांनी त्यांची मिरवणूक काढली होती. १ एप्रिल १९९३ रोजी गडहिंग्लज येथील बॅ. नाथ पै विद्यालयाच्या मैदानावर जनता दलाचा जिल्हास्तरीय शेतकरी मेळावा झाला. त्यास ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासह ज्येष्ठ नेत्या मृणालताई गोरे, शंकर धोंडी पाटील व श्रीपतराव शिंदे यांची शेतकऱ्यांनी उघड्या जीपमधून मिरवणूक काढली होती. नूल येथे जनता दलाचा मेळावा झाला होता. त्या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी फर्नांडीस आवर्जून उपस्थित होते.
....अन् जॉर्ज कानडीतून बोलले
मराठी, हिंदीसह तब्बल १६ भाषेत अस्खलीत बोलणाºया जॉर्ज यांनी नूलच्या सभेत मराठी व हिंदीत बोलायला सुरूवात केली. त्यावेळी सीमाभागातील कानडी शेतकºयांनी त्यांना कानडीतून बोलण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांनी केलेल्या अस्खलीत कानडी भाषणाने उपस्थित चकीत झाले होते.
‘बटाटे’ आणि ‘वेफर्स’..!
नव्वदच्या दशकात बटाट्याचे वेफर्स बाजारात यायला सुरुवात झाली होती. त्यादरम्यान गडहिंग्लजला झालेल्या शेतकरी मेळाव्यात त्यांनी बटाट्याला मिळणारा कवडीमोलाचा भाव, त्यापासून बनविलेल्या ‘वेफर्स’ची किंमत यावरून शेतकºयांना कसे नाडवले जाते, याचा हिशेब मांडला होता.