कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबणार, शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक-विद्यार्थ्यांचे संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 12:38 IST2025-02-14T12:37:07+5:302025-02-14T12:38:50+5:30

संशोधनाला जर्मन पेटंट

German government patents research on breast cancer treatment by Shivaji University researchers | कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबणार, शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक-विद्यार्थ्यांचे संशोधन

कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबणार, शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक-विद्यार्थ्यांचे संशोधन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधकांनी स्तनाच्या कर्करोगावरील उपचारांच्या अनुषंगाने केलेल्या नावीन्यपूर्ण संशोधनास जर्मन सरकारचे पेटंट प्राप्त झाले. या संशोधन कार्यात रसायनशास्त्रज्ञ डॉ. शंकर हांगिरगेकर यांच्यासह डॉ. नवनाथ वळेकर आणि संशोधक विद्यार्थी अक्षय गुरव, ललित भोसले यांनी सहभाग घेतला.

बायोमासमधील नैसर्गिक घटकांचा वापर करून फुरफुराल हा घटक वेगळा करून हायड्राझिनिल थायाझोल हे संयुग बनविण्यात संशोधनांतर्गत यश आले. हे संयुग स्तनाच्या कर्करोगावरील आधुनिक आणि प्रभावी उपचारांसाठी मोलाचे ठरणार आहे.

या संशोधकांनी विकसित केलेल्या संयुगामुळे स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवणे शक्य होणार असून पारंपरिक उपचार पद्धतीच्या दुष्परिणामांना आळाही बसेल. संशोधनाबद्दल कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे व रसायनशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. कैलास सोनावणे यांनी संशोधक चमूचे अभिनंदन केले.

उपचार पद्धती अधिक प्रभावी, सुरक्षित

आजच्या जीवन शैलीमुळे स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका अधिकच वाढत चालल्याने यामुळे मृत्यूदरही अधिक आहे. सध्या या कर्करोगाच्या उपचारासाठी शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिओथेरपी, हार्मोनथेरपी, इम्युनोथेरपी अशा विविध प्रकारच्या उपचार पद्धती वापरात आहेत; परंतु या पद्धतींमध्ये रुग्णाला उपचारादरम्यान होणाऱ्या दुष्परिणामांना (साइड इफेक्ट्स) सामोरे जावे लागते. या संशोधनामुळे स्तनाच्या कर्करोगावरील उपचार पद्धती अधिक प्रभावी आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे, असे डॉ. हांगिरगेकर यांनी सांगितले.

Web Title: German government patents research on breast cancer treatment by Shivaji University researchers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.